आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्‍यावरून झालेल्या हाणामारीत 1 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शेतातील बोअरच्या पाण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत बुधवारी एकाचा मृत्यू झाला. गणेश त्र्यंबक रिठे (25) असे मृताचे नाव असून, त्यांचा भाऊ बाबासाहेब जखमी झाला आहे. या प्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, चौघांना अटक झाली आहे.


चिकलठाण्याच्या धनगरगल्लीत रहिवासी गणेश रिठे याने शेतात बोअर घेतला होता. त्याला चांगले पाणी लागले. गणेश यांच्या शेतालगत त्यांचे काका सखाहरी रिठे यांच्या शेतात आधीचा बोअर होता. गणेश यांच्या बोअरमुळे आपल्या बोअरचे पाणी कमी झाल्याचे सखाहरी यांचे म्हणणे होते. त्यावरून दोन्ही कुटुंबांत वाद होता. गणेश यांचा बोअर सखाहरी व त्यांच्या कुटुंबीयांनी बुजवला.


भाऊ बाबासाहेबसह गणेश बुधवारी सखाहरी यांच्याकडे जाब विचारण्यासाठी गेला. या वेळी सखाहरी, चिमाजी रिठे, दगडू , निवृत्ती रिठे, दादाराव गायके, शारदाबाई दगडू रिठे, जनाबाई निवृत्ती रिठे, कस्तुराबाई सखाहरी रिठे आणि बाळू सखाहरी रिठे यांनी गणेश आणि बाबासाहेब यांच्यावर चाकू, कु-हाड आणि तलवारीने हल्ला केला. यात गणेशच्या मानेवर कु-हाडीने आणि पोटावर चाकूने वार करण्यात आले. त्याचा जागीच मृत्यू झाला. तर एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात दगडू, निवृत्ती आणि बाळासाहेब गंभीर जखमी झाले.


या हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत दगडू, निवृत्ती आणि बाळासाहेबला पोलिसांनी रुग्णालयात हलवले. तर गणेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत पाठवण्यात आला. लंकाबाई गणेश रिठे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिसांनी 9 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सखाहरी, चिमाजी, शारदाबाई, जनाबाई यांना अटक करण्यात आली आहे. दगडू आणि निवृत्ती यांना ताब्यात घेतले आहे. अटकेतील चौघांना न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर गायके, कस्तुराबाई आणि बाळू फरार झाले आहेत.