आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जूनच्या पंधरवड्यात यंदा केवळ २.६ मिमी पाऊस पडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मान्सूनच्या पावसाचे लांबलेले आगमन शेतकरीच नव्हे तर सर्वांनाच अस्वस्थ करणारे ठरत आहे. गतवर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात १४८ मिमी पाऊस पडला होता. २०१४ मध्ये ५७ मिमी २०१५ मध्येही जोरदार पाऊस पडल्याची नोंदी आहेत. यंदा मात्र जूनचा पहिला पंधरवडा लोटत आला असताना केवळ २.६ मिमी पाऊस झाला असून पावसाच्या आगळ्या विक्रमाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. मे अखेर ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनपूर्व पाऊस त्यापाठोपाठ मान्सून दाखल होतो.

रोहिण्या बरसल्या नाही तरी मृग नक्षत्रात हमखास पाऊस पडतो. गतवर्षी तर मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला जून रोजी सुरू झालेला पाऊस २० जूनपर्यंत जोरदार बरसला. १५ जूनपर्यंत १४८ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे ९० टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली होती. जून २०१४ रोजी एकाच दिवशी ५७ मिमी पाऊस पडला होता. मात्र या दोन्ही वर्षी त्यानंतर पावसाचा चार ते पाच आठवड्यांचा मोठा खंड पडून कोवळी पिके आणि फळबागा जळून गेल्या. सर्वच उत्पादनांत ६० ते ८० टक्क्यांपर्यंत घट आली.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज असताना जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सर्वात कमी २.६ मिमी पाऊस पडण्याचा नवा विक्रम घडला आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वन्यजीव घोटभर पाण्यासाठी वनवन भटकत आहेत. पेरणीसाठी अातुर शेतकरी चिंतातूर झाला आहे.

वातावरणच ठरवणार पावसाची दिशा : हवामानविषयक संस्थांनी या वर्षी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असली तरी वातावरणच पावसाची दिशा निश्चित करणार आहे. कारण पाऊस कधी येईल, किती दिवसांत हा पाऊस पडेल, खंडाचे दिवस किती असतील याबाबत काहीच सांगितले जात नाही. तसे तंत्रज्ञानही उपलब्ध नाही. यंदा पहिल्यांदाच जूनचा पंधरवडा कोरडा गेला आहे. पावसाला अजून आठ दिवस तरी लागतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मराठवाड्यात सध्या अनिश्चित स्थिती
मराठवाड्यात मान्सून दाखल होण्यासाठी सध्या पोषक वातावरण नाही. त्यामुळे तो कधीपर्यंत दाखल होईल हे निश्चित सांगता येणार नाही. डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ.

...तर वेळ लागणार नाही
आजवरच्या मान्सूनच्या आगमनाचा अभ्यास केला असता मराठवाड्यात १५ जूनपर्यंत मान्सून दाखल झाल्याचे दिसून येते. त्यानुसार दोन दिवस जायचे आहेत. पोषक वातावरण तयार झाल्यास मान्सून धडकण्यास वेळ लागत नाही. प्रल्हाद जायभाये, मुख्यसमन्वयक, ग्रामीण कृषी हवामान विभाग, वनामकृवि. परभणी.

आजचे तापमान
* कमाल ३७.९ किमान २५.३ * ६ ते १४ जून २०१५ पर्यंत १२६ मिमी १५ जूनपर्यंत १४८ मिमी पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. * ९ जून २०१४ एकाच दिवशी ५७ मिमी पाऊस पडला होता.