आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसवर दुचाकी धडकली; तरुण-तरुणी ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद दौलताबाद  - खुलताबादहून औरंगाबादकडे येणाऱ्या तरुण-तरुणीची भरधाव दुचाकी समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की दोघेही बससोबत ३० ते ४० फूट फरपटत गेले. यात दोघांचाही करुण अंत झाला. शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास दौलताबाद टी पॉइंटजवळ हा अपघात घडला. दीपंकर अनिरुद्ध खंडारे (२२, रा. पुणे) नेहा देवेंद्र काकडे (१८, रा. शासकीय वसतिगृह, पुष्पनगरी) अशी मृतांची नावे आहेत. 
 
दीपंकर हा नेहाच्या आत्याचा मुलगा होता. देऊळगावराजा तालुक्यातील मेव्हणाराजा हे त्यांचे मूळ गाव होते. नेहा मिलिंद महाविद्यालयात विज्ञान शाखेची बारावीची विद्यार्थिनी होती, तर दीपंकर पुण्याला खासगी नोकरी करत होता. शुक्रवारी सकाळी दोघे दुचाकीने (एमएच १२ जेडब्ल्यू ९८१४) खुलताबादला फिरायला गेले होते. सकाळी ९.४५ ते १० च्या दरम्यान ते शहराकडे परत येण्यासाठी निघाले. या वेळी दौलताबाद टी पॉइंटकडून एसटी बस (एमएच २० बीएल १७५१) खुलताबादच्या दिशेने जात होती. शरणापूर फाट्याच्या पुढे असलेल्या एका हॉटेलसमोर दीपंकरचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट समोरून येणाऱ्या एसटी बसवर धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की समोरील चाकात अडकलेल्या दुचाकीसह बस ३० ते ४० फुटांपर्यंत पुढे गेली. यात दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दौलताबाद पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. 
 
ओळखपत्रामुळे पटली ओळख : अपघातस्थळीनेहाच्या बॅगमध्ये महाविद्यालयाचे ओळखपत्र इतर कागदपत्रे सापडली. यावरून ओळख पटली. महामार्ग पोलिस विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक आर. सी. निकम, हवालदार अरुण पगारे, संदीप वर्पे, नारायण भिसे, नितीन जाधव, व्ही. बी.गायके, एकनाथ गायकवाड यांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मृतदेह घाटीत हलवण्यासाठी अब्दीमंडी येथील राजू लिंगे, संदीप शेळके, आमेर शेख, गणेश बनकर, बालाजी ढंगारे यांनी पोलिसांना मदत केली. दौलताबाद ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय माटे, बाजीराव पगारे, दिनेश सूर्यवंशी, वाहतूक पोलिस उपनिरीक्षक देवरे यांनीही सहकार्य केले. 
नऊ दिवस गावी राहिल्यानंतर नेहा गुरुवारी दुपारी साडेचार वाजता शहरात आली. 

शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता तिची ट्यूशन होती. वसतिगृहाच्या एका खाेलीमध्ये सहा मुली राहतात. शुक्रवारी सकाळी इतर मैत्रिणी ट्यूशनला जाण्यासाठी तयारी करत असताना नेहासुद्धा तयार होत होती. परंतु ती दीपंकरसोबत बाहेर जात असल्याचे कुणालाही सांगितले नाही. दीपंकर गुरुवारी दुपारी दुचाकीने त्याचा मामा सुरेश हिवाळे यांच्याकडे आला होता. गुरुवारी मामाकडे मुक्कामाला राहिला. 

कालगावावरून आली, आज ट्यूशनला आलीच नाही : घटनेचीमाहिती कळताच नेहाच्या मैत्रिणींनी शवविच्छेन विभागाबाहेर गर्दी केली. नेमके काय झाले हे त्यांना कळत नव्हते. दौलताबाद पोलिसांनी त्यांना बसवून घटना सांगितली. पोलिस सांगत असतानाच मैत्रिणींना रडू आवरत नव्हते. आम्हाला आमच्या मैत्रिणीला पाहू द्या, अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली. परंतु मुली लहान असल्याने पोलिसांनी आधी नकार दिला. परंतु मुलींनी धीर दाखवल्यावर मैत्रिणींनी नेहाचा मृतदेह पाहून ओळख पटवली. 

दुचाकी चाकात अडकली आणि बसचे ब्रेक लायनर तुटले 
दीपंकरची भरधाव दुचाकी बसच्या समोरील भागावर आदळली. दुचाकी बसच्या चाकावर वेगात आदळल्याने बसचे ब्रेकलायनर तुटले. यात दीपंकरच्या डोक्याचे काही तुकडे चालकाजवळ येऊन पडले. बसमध्ये साठ प्रवासी होते. चालकाने बसवर नियंत्रण मिळवल्याने बसचा अपघात टळला. दुचाकी बसखाली येताच मोठा आवाज झाला. परंतु ब्रेक फेल झाल्याने बस उतारावर असल्याने दुचाकी लांबपर्यंत फरपटत गेली. 
 
बातम्या आणखी आहेत...