आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Thousand 106 Form Filed For Aurangabad Municipal Corporation Elections

महापालिका निवडणूक : रणधुमाळी सुरू; २१०६ अर्ज दाखल, आजपासून माघारीचे सत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : शेवटचा दिवस असल्याने सिडकोतील वॉर्ड कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली होती.
औरंगाबाद - मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड झुंबड उडाली. दहाही निवडणूक कार्यालयांत दिवसभरात २१०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या आकडेवारीची पडताळणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. २२ एप्रिल रोजी होणा-या मनपा निवडणुकीसाठी ३१ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेला कालच खरा वेग आला होता. आज दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची वेळ संपली तरी इतर सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास सायंकाळ उलटून गेली. त्यानंतर आलेल्या अर्जांच्या आकडेवारीची पडताळणी करण्याचे काम सुरू झाले ते रात्री उशिरापर्यंत चालले. मनपा निवडणुकीसाठी २१०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून सध्या तरी साधारणपणे एका वाॅर्डात सरासरी १५ ते १८ उमेदवार आहेत.

पहाटेपर्यंत घोळ सुरूच : सोमवारी सायंकाळी युतीची घोषणा करीत जागावाटप जाहीर करण्यात आले खरे, पण तरीही जागांचा घोळ मिटता मिटत नव्हता. भाजपच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक रात्री उशिरा झाली तर शिवसेनेची कोअर कमिटी पहाटे अडीच वाजेपर्यंत खासदार खैरे यांच्या बंगल्यावर माथेफोड करीत बसली. त्यातही अंतिम तोडगा निघाला नाही पण संख्येवर फक्त एकमत झाले होते.

घडामोडे व महापौरांसाठी तडजोड : मुलगा, पुतण्या व महापौर कला ओझा अशा तीन तिकिटांसाठी आपली २५ वर्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावणा-या खासदार खैरे यांच्यामुळे विद्यानगर, बाळकृष्णनगर व रामनगर असा तीन वाॅर्डांचा तिढा निर्माण झाला. भाजपला शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांच्यासाठी सेनेकडचा रामनगर हवा होता, तर सेनेला म्हणजे खासदार खैरे यांना महापौरांसाठी भाजपकडील बाळकृष्णनगर हवा होता. राजू वैद्य यांनी आपले तिकीट मुंबईतून आणल्याने विद्यानगरात ओझा यांना घुसवणे खैरे यांना अवघड बनले होते. अखेर घडामोडेंसाठी भाजपने बाळकृष्णनगरातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा बळी देत रामनगर पटकावले.

रावतेंच्या उमेदवारावरून घोळ : महापालिका निवडणुकीत तिकीट मिळावे यासाठी इच्छुकांनी शक्य ते सारे प्रयत्न केले. त्यातच वंदना रमेश इधाटे यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून मयूरनगर वाॅर्डातून तिकीट मिळवले होते, पण खैरे यांनी विद्यमान सभागृह नेते किशोर नागरे यांच्या पत्नीला तिकीट देण्यासाठी शक्ती पणाला लावली. या घोळात दोन्ही उमेदवारांना पक्षाकडून दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी बी फाॅर्म दिला. दोघींनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक केंद्रावर कोणाचा अर्ज स्वीकारायचा यावरून गदारोळ झाला.

मयूरनगरातील उमेदवारी रोखली : तिकडे पाच वाजता शिवसेनेने उमेदवारांची यादी एकदाची जाहीर केली. त्यात मयूरनगरातून वंदना इधाटे यांच्या नावाची घोषणा झालेली होती. पण दहाच मिनिटांत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या कार्यालयातून दैनिकांना ई-मेल पाठवून मयूरनगरातील उमेदवारांचे नाव थांबवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. आता सी फाॅर्मसाठी घोडे अडले आहे.

जैन वेदांतनगरात परतले : मिटमिट्याचा घोळही काल रात्रीपर्यंत सुरू होता. विकास जैन यांनी मिटमिट्यात घुसखोरी करीत पदाधिका-यांना आपल्या बाजूला वळवलेही होते. तिकडे सभापती विजय वाघचौरेही जोर लावून होते. वेदांतनगर वाॅर्डात ओबीसी उमेदवार मिळत नसल्याने व महापौरपदाच्या शर्यतीतून जैन यांचा पत्ता कापण्यासाठी त्यांना वेदांतनगर आॅफर करण्यात आले. जैन यांनी विद्यमान वाॅर्ड असल्याने ते मान्य केले. यामुळे मिटमिट्यातील पदाधिकारी भडकले व आता बाहेरचा नको, असे सांगत त्यांनी रावसाहेब आमले यांचे
नाव निश्चित केले.

तीन जिल्हा सरचिटणीसांपैकी केवळ एकालाच उमेदवारी
भाजपकडून महापालिकेत तीन जिल्हा सरचिटणीसांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, केवळ एकालाच पक्षाकडून संधी देण्यात आली. दिलीप थोरात यांना वॉर्ड क्र. ९८ उल्कानगरीमधून संधी देण्यात आली. या वाॅर्डातून भाजपचे जिल्हा सरचिटणीस हेमंत खेडकरदेखील इच्छुक होते, तर कचरू घोडके यांनीदेखील कोटला कॉलनी आणि क्रांती चौकमधून उमेदवारी मागितली होती. नगरसेवक अनिल मकरिये यांनाही पक्षाने कुठेच संधी दिलेली नाही.

पुढे वाचा.... सेनेचा घोळ शेवटपर्यंत