औरंगाबाद - रोशनगेट जवळील गजबजलेल्या वस्तीतून अवघ्या २० मिनिटांत चोरट्यांनी साडेतीन लाख रुपये रोख आणि २४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी रात्री साडेसात ते पावणेआठच्या सुमारास घडली.
मकसूद कॉलनीतील मशिदीसमाेर भाड्याने राहणारे मोहंमद इंझमाम कुरेशी (३०) कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी (दि. ११) त्यांच्या घरमालकाच्या घरी लग्नाची तयारी सुरू असल्याने त्यांच्या दोघी बहिणी ७.३० वाजेच्या सुमारास घरमालकाकडे गेल्या, तर वडील फेरफटका मारण्यासाठी गेले होते. इंझमाम एकटेच घरी होते. ते मित्रासह घराला कडी लावून थोड्या वेळासाठी बाहेर गेले. हीच संधी साधून चोरट्याने घरात शिरून कपाटातील सुमारे साडेतीन लाखांची रोख, २० हजारांचे सोन्याचे दागिने, हजार रुपयांचे चांदीचे पैंजण असा ऐवज चोरून नेला. अवघ्या १० ते २० मिनिटांत चोरट्याने हात साफ केला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमापुंजी नेली
खुलताबादयेथील उरुसात इंझमाम यांनी कपडे विकण्याचे दुकान टाकले होते. उरुसात कपडे विकून आलेले पैसे, नुकत्याच लागलेल्या बीसीचे पैसे आणि कपडे विकत आणण्यासाठी त्याने जमवलेले एक लाख रुपये असे सर्वच पैसे चोरीला गेले.