आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅसेंजरमध्ये निम्म्यापेक्षा जास्त; एक्स्प्रेस गाड्यांत 20% फुकटे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - दक्षिणमध्य रेल्वेच्या नांदेड विभागात पॅसेंजरमधून प्रवास करणारे ६० टक्के प्रवासी फुकटे आहेत, तर एक्स्प्रेसमध्ये फुकट्यांचे प्रमाण २० टक्के आहे. अशा फुकट्यांना जरब बसवण्यासाठी विशेष भरारी पथक नेमले असून या पथकाने एकाच दिवसात ४०० फुकट्यांकडून लाख ८७ हजार रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती नांदेडचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) डॉ. अखिलेश सिन्हा यांनी दिली. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने मंगळवारी शहरातील रेल्वेस्थानकावर कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे अदालत आणि वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी पीसीपीओ एन. व्ही. रामण्णा रेड्डी, डॉ. सिन्हा तपोवन एक्स्प्रेसने आैरंगाबादेत आले होते. डॉ. सिन्हा यांनी नांदेडपासूनच इंजिनमधून प्रवास केला. 
 
पीडब्ल्यूआय, लोकोचे सुपरवायझर त्यांच्यासोबत होते. धावत्या इंजिनमधूनच रेल्वेरुळांच्या आजूबाजूचा भाग पाहत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. कर्मचाऱ्यांसाठी आयोजित शिबिरात २५ कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील चौघांना उच्चरक्तदाब आणि शुगरची लक्षणे आढळून आली आहेत. जालना रेल्वे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी राम मोहन यांनी ही तपासणी केली. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वे झाेनचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी नुकतीच आैरंगाबाद स्थानकास भेट देऊन लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांनी आैरंगाबाद गँगमन तुकडीस २० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. चिकलठाणा येथील तुकडीस हजारांचे बक्षीस दिले होते. महाव्यवस्थापकांनी घोषणा केल्यानंतरही बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार लोकअदालतीत करण्यात आली. त्यावर नोव्हेंबरअखेरपर्यंत संबंधितास रक्कम अदा करण्याचे आदेश डॉ. सिन्हा यांनी दिले. 
 
तपोवनच्या चालकांचा गौरव : जालनास्थानकानंतर सिन्हा यांनी विशेष भरारी पथकासह तिकीट तपासणी केली. तपोवन एक्स्प्रेस नियोजित वेळेवर धावल्याबद्दल त्यांनी या गाडीचे चालक प्रशांत झेड आणि सहायक चालक जितेंद्र कुमार या दोघांना रिवाॅर्ड दिला. 
एकाच दिवशी सर्वाधिक दंडात्मक कारवाई करणाऱ्या विशेष भरारी पथकातील सीटीआय अशोक कुमार यांनाही रिवाॅर्ड दिला. अशोक कुमार यांनी फुकट्या प्रवाशांकडून एकाच दिवशी १८ हजारांचा दंड वसूल केला. 
 
मृत गॅँगमनच्या वारसांना २५ लाख 
लातूर येथे रात्री पेट्रोलिंग करीत असताना निधन झालेल्या दिलीप अंबादास बावचे याच्या वारसास २५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. दिलीप बावचे यांचे २६ जून २०१७ रोजी पेट्रोलिंग करीत असताना निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या वारसांना मदत मंजूर झाली. 
 
उत्पन्नात वाढ; रेल्वेची दिवाळी 
दिवाळीच्याकाळात गतवर्षी ७७ हजार प्रवाशांच्या तिकिटाच्या रकमेतून ३२ लाख ३० हजारांचे उत्पन्न मिळवणाऱ्या रेल्वे विभागाला यंदाची दिवाळी उत्पन्नवाढीची ठरली. यावर्षी लाख ४० हजार ६६६ प्रवाशांच्या तिकिटाच्या रकमेतून ४८ लाख ३४ हजार ६२० रुपयांचे उत्पन्न मिळाले असून दिवाळीच्या काळातील एका महिन्यात यंदा १६ लाखांनी उत्पन्न वाढल्याचे सिन्हा म्हणाले. 
 
बडगा उगारताच दंड वसूल 
पॅसेंजरगाडीच्या एकाच डब्यात जवळपास ६० टक्के प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. दंडात्मक कारवाईची कल्पना देताच दंड भरू शकत नसल्याचे या प्रवाशांनी सांगितले. मात्र, दंड भरणार नसाल तर फौजदारी कारवाईसाठी आरपीएफच्या ताब्यात देऊ, असा इशारा देताच या फुकट्यांनी दंड भरून सुटका करून घेतली, असे डॉ. सिन्हा यांनी सांगितले. 
 
बंद रेल्वेस्थानके सुरू करणार
जालना-आैरंगाबाद दरम्यानची दिनेगाव गेवराई ही बंद पडलेली रेल्वेस्थानके पुन्हा सुरू करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. जालन्याजवळच ड्रायपोर्ट तयार होत असल्यामुळे त्यांनाही स्वतंत्र लाइन देण्यात येणार आहे. जेएनपीटी हा खर्च करणार असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले. रेल्वे विभाग रेल्वेलाइनवर दहा कोटी रुपये खर्च करणार असून त्यासाठी मंजुरी मिळाल्याचे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...