आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या 20 वॉर्डांत मुबलक पाण्याची दिवाळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पाणीपुरवठय़ातील घोळामुळे जुन्या शहरात हाणामार्‍यांपर्यंत वेळ आली असून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न मनपाने सुरू केले आहेत. 80 टक्के भरलेल्या हर्सूल तलावातून येत्या 29 तारखेपासून जुन्या शहरातील 20 वॉर्डांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, राजाबाजार आणि शहाबाजार भागात पाणी सोडण्यावरून वादावादीच्या घटना शुक्रवारी घडल्या, तर संजयनगर जिन्सीच्या नागरिकांनी सहा दिवसांपासून पाणी नसल्याने गुरुवारी मध्यरात्री महापौरांचे निवासस्थान गाठत आपले गार्‍हाणे मांडले. या दोन घटनांनंतर पाणीपुरवठा विभागाची झाडाझडती महापौरांनी घेतली आणि या नागरिकांना भरपूर पाण्याची दिवाळी भेट मिळेल याची खात्री केली.

गेल्या तीन महिन्यांपासून शहरात पाणीपुरवठय़ाची स्थिती गंभीर बनली आहे. वीजपुरवठय़ातील अडचणी, पाणी वितरणातील अडथळे यामुळे निम्म्याहून अधिक शहरात पाण्याची अवस्था बिकट बनली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सहा सहा दिवस पाणी येत नाही, ठरलेल्या दिवशी पाणी येत नाही, आले तर कमी दाबाने पाणी येते अशा स्थितीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. पाण्यावरून संघर्ष भडकण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सहा दिवसांपासून ठणठणाट : संजयनगर, जिन्सी भागात गेल्या सहा दिवसांपासून पाणी आलेले नव्हते. कालचा दिवस पाण्याचा होता, पण पाणी आले नाही. मग संतापलेल्या नागरिकांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास महापौर कला ओझा यांचे निवासस्थान गाठले आणि आपली समस्या कानावर टाकली. नागरिकांनी आपल्या संतप्त भावना महापौरांना सांगितल्या व त्यांनी शुक्रवारी याबाबत बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले. पाणीपुरवठय़ाचे कर्मचारी, अधिकारी विचारणा केली तर दुरुत्तरे करतात, नगरसेवकाकडे जा नाही तर पदाधिकार्‍याकडे अशा भाषेत उत्तरे देतात, अशा तक्रारी त्यांनी केल्या.

वादावादीवर निभावले : शहागंजच्या पाण्याच्या टाकीवरून होणार्‍या पाणीपुरवठय़ात भेदभाव होत असल्याच्या तक्रारींवरून शुक्रवारी नागरिकांच्या दोन गटांत वादावादी झाली आणि वातावरण तापले. नगरसेवक मीर हिदायत अली यांनी सांगितले की, वेळापत्रकानुसार आज शहाबाजार परिसराचा पाण्याचा दिवस होता, पण राजाबाजार परिसरात पाणी सोडण्यात आले. पाण्याची वाट पाहत बसलेल्या नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेत कर्मचार्‍यांकडे विचारणा केली, पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या वादाची माहिती कळताच राजाबाजारातील नागरिकही टाकीकडे आले, तेथे काही काळ या दोन गटांत वादावादी झाली. नगरसेवक मीर हिदायत अली यांनी धाव घेत नागरिकांना शांत केले. त्यांनी मनपाच्या अधिकार्‍यांना फोन करूनही तासभर कुणीच आले नाही. अखेर पाणी सोडण्यात आल्यानंतर हा वाद थांबला.

मनपात बैठक
दुपारी महापौर कला ओझा यांच्या दालनात पाणीपुरवठय़ाबाबत बैठक बोलावण्यात आली होती. त्यात कार्यकारी अभियंता आणि विभागातील सर्व उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांची उपस्थिती होती. शिवाय उपमहापौर संजय जोशी, सभागृहनेते सुशील खेडकर, गटनेते गजानन बारवाल, राष्ट्रवादीचे गटनेते अफसर खान, विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान, मीर हिदायत अली यांची उपस्थिती होती. त्यात महापौरांनी पाणीपुरवठा विभागाची झाडाझडती घेतली. पाणीपुरवठा विस्कळीत का झाला याची माहिती घेताना नागरिकांना एकतर पाणी मिळत नाही आणि वर दुरुत्तरे करता हे चालणार नाही, असा दम त्यांनी दिला. वीजपुरवठा खंडित झाल्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, टाक्या भरणे अवघड झाले आहे, हसरूल तलावाचे पाणी जुन्या शहराला मिळत नसल्याने पाणीपुरवठय़ावर ताण आला आहे आदी कारणे हेमंत कोल्हे यांनी सांगितली.

मीटिंग महत्त्वाची का फोन?
या बैठकीत महापौर कला ओझा पाणीपुरवठय़ासंबंधी सूचना देत असताना कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना एक फोन आला आणि त्यांनी मोबाइल घेत बोलणे सुरू केले. हे पाहून महापौर भडकल्या. म्हणाल्या, ‘अहो महत्त्वाची मीटिंग सुरू आहे. फोनवर कसले बोलता? फोनपेक्षा मीटिंग महत्त्वाची आहे.’

वर्षपूर्तीला जलपूजन
त्यावर महापौर कला ओझा यांनी येत्या 29 ऑक्टोबर रोजी हसरूल तलावातून जुन्या शहराला पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले. सध्या तलाव 80 टक्के भरला असून साधारणपणे एप्रिलपर्यंत त्यातून जुन्या शहराला पाणी देता येऊ शकते. यामुळे साधारणपणे 20 वॉर्डांना पाणी मिळणार आहे. काल खासदार चंद्रकांत खैरे यांनीही एका बैठकीत पाणीपुरवठय़ाची समस्या जाणून घेत हसरूल तलावातून पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गतवर्षी 29 ऑक्टोबर रोजी कला ओझा यांची महापौरपदी निवड झाली होती. त्या नियुक्तीच्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधून हसरूलचे जलपूजन करण्यात येणार आहे.

या भागांत पाण्याची ओरड
बेगमपुरा, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी, गारखेडा, सिडको, हडको, राजाबाजार, शहाबाजार, शहागंज, नबाबपुरा, गुलमंडी, दिवाणदेवडी, अंगुरीबाग, एसटी कॉलनी, रोशनगेट, कटकट गेट, कैसर कॉलनी, संजयनगर, जिन्सी, मोंढा, धावणी मोहल्ला.
हसरूल तलावाची स्थिती
0पाणीसाठा : 80 टक्के
0वॉर्डांची संख्या : 20
0नागरिकांची संख्या : 1.5 ते 2 लाख
0दररोज पुरवठा : 05 एमएलडी


काय होणार फायदा ?
0 हसरूल तलावातून येणारे पाणी गुरुत्वाकर्षणामुळे थेट टाक्यांपर्यंत येते. त्यामुळे क्रांती चौकातून जुन्या शहरातील टाक्यांपर्यंत पाणी पाठवण्यासाठी लागणार्‍या विजेचा खर्च वाचणार
0 या तलावातून पाणीपुरवठा सुरू झाल्यावर उर्वरित शहरासाठी पाच एमएलडी पाणी जादा मिळणार. परिणामी या भागांतील पाणीपुरवठय़ावरचा ताण काही अंशी हलका होणार
0 20 वॉर्डांतील दीड ते दोन लाख लोकांपुरते हे पाणी मुबलक असल्याने या भागांत होणारी पाण्याची ओरड निदान एप्रिलपर्यंत थांबणार आहे.