आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरेंसाठी २०० वकिलांची फौज, ‘सनातन’च्या विरोधात पुरोगामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाचा आरोप असलेल्या समीर गायकवाडचे वकीलपत्र घेण्यास सनातन संस्थेसह ३१ वकिलांनी तयारी दर्शवली होती. या घटनेचा प्रतीकात्मक निषेध म्हणून कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येचा खटला लढत असलेल्या सरकारपक्षाच्या बाजूने राज्यभरातून वकीलपत्र येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात हा आकडा २५०० पेक्षा पुढे गेला असून औरंगाबादेतून २०० जणांनी वकीलपत्र घेण्याची तयारी दर्शवल्याची माहिती अॅड. महेश भोसले यांनी दिली.

अखेरच्या श्वासापर्यंत चळवळीत आयुष्य घालवणारे कॉम्रेड पानसरे व्यवसायाने वकील होते. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ वकिलांनी कोल्हापुरात मोर्चा काढून निषेध नोंदवला होता. त्यावेळी आरोपीचे वकीलपत्र घेण्याचा निर्णय वकील संघाने घेतला होता. कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचे धागेदोरे आता जाहीर झाल्यामुळे सनातन संस्थेचाच त्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप असल्यामुळे वकीलपत्र घेण्यासाठी ३१ जणांनी तयारी दर्शवली होती. यावर प्रतिक्रिया म्हणून आता पुरोगामी, धर्मनिरपेक्ष वकिलांनीही सरकारपक्षाला मदत करण्यासाठी वकीलपत्र सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. औरंगाबादेतून दोनशेपेक्षा अधिक वकीलपत्र सादर होत असल्याचे अॅड. महेश भोसले यांनी सांगितले. राज्यात हा आकडा अडीच हजारपेक्षा अधिक झाला आहे. भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांनीही स्वत:चे वकीलपत्र सादर केले आहे. त्याशिवाय सांगली येथून अॅड. प्रकाश मोरे आणि अॅड. अमित शिंदे यांनी जास्तीत जास्त वकीलपत्र घेण्यास सुरुवात केली आहे. अॅड. शिंदे यांच्या मते हा आकडा हजारपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने औरंगाबादेतील अॅड. महेश भोसले यांनीदेखील या चळवळीत सहभाग घेतला असून त्यांनी २०० जणांचे वकीलपत्र जमा केल्याचे ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

सोशल मीडियावरून व्हायरल
सरकारपक्षाच्यामदतीसाठी पुरोगामी वकिलांची फौज उभी करण्यासाठी सोशल मीडियावरून संदेश पाठवले जात आहेत. हा संदेश आता इतका व्हायरल झाला की, राज्यातील वकिलांनी वकीलपत्र सादर करण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सांगली येथील अॅड. के. डी. शिंदे, अॅड. अमित शिंदे, कोल्हापूर येथून अॅड. प्रकाश मोरे, अॅड. विवेक घाडगे आणि औरंगाबादेतून अॅड. महेश भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. फौजदारीमध्ये काम करणाऱ्या सर्व तज्ज्ञ वकिलांनी आपली वकीलपत्रे दाखल केली आहेत.