आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्याग्रस्तांच्या २०० मुलांचे संगोपन; कनके यांचा 'आपली मुले' उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समाजऋणातून उतराई होण्याच्या भावनेतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारण्याचे काम श्यामसुंदर पंडितराव कनके यांनी केले आहे. मराठवाडा व विदर्भातील गावोगाव फिरून २०४ मुलांना त्यांनी औरंगाबादेत आणले असून, सातारा भागात "आपली मुले' उपक्रम सुरू केला आहे. यात मुलांच्या निवास, जेवणखाण व शिक्षणाचा खर्च उचलला जातो. महिन्याला तीन लाख खर्च येतो.

मूळ जालना जिल्ह्याच्या अंबडमधील भांबेरी गावचे कनके परभणीत कोचिंग क्लासेस चालवत होते. औरंगाबादेत अडबंगनाथ सेवाभावी संस्थेअंतर्गत त्यांनी २००४ मध्ये डाॅ. हेडगेवार मेमोरियल पब्लिक स्कूल सुरू केली. या विनाअनुदानित शाळेत ४०० पैकी निम्मे विद्यार्थी मोफत शिक्षण घेतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे व्यथित कनके यांनी त्यांच्या मुलांची जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवले.
यादी मागवून, बाजारात प्रचार
मराठवाड्यासह विदर्भाच्या बुलडाणा, अकोला व यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची यादी कनके यांनी मागवली. संपर्क साधून मुलांना शाळेत दाखल करण्याची विनंती केली. पहिली ते बारावीपासून पॉलिटेक्निक, इंजिनीअरिंग, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट इतर कोर्सेसला मोफत प्रवेश घेण्याचे आवाहन केले. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी औरंगाबाद, जालना, बीडच्या आठवडी बाजारात पत्रके वाटली. "यमाच्या गावाला जाऊ नका' या आगामी चित्रपटातील गीताच्या सीडी लावून लोकांचे लक्ष ते वेधून घेत असत. शिवाय अशा कुटुंबांच्या प्रत्यक्ष भेटीही त्यांनी घेतला. यातून मग प्रतिसाद मिळू लागला. यापुढे शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रकल्प उभा करण्याचा कनके यांचा मानस आहे.
पहिली ते बारावीचे विद्यार्थी
शाळा १५ जूनला सुरू झाली तेव्हा १३२ मुले व ७२ मुली असे २०४ विद्यार्थी आले. साडेचार वर्षाची दुर्गा ही सर्वात लहान आहे. यातील ७ मुले तर आई, बहिणी, आजीसोबत येथे आले आहेत. या महिलाच येथे स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळतात.
दानशूरांचीही मदत
समाजातील दानशूरांची त्यांना मदत होत आहे. लंडनमधील कर्तव्य फाऊंडेशनचे श्याम वाकोडकर, मुंबई, दिल्ली व चीनहूनही मदतीची विचारणा झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शाळेला भेट देणार आहेत.
२६ शिक्षक सेवाव्रती
दीड लाखांचा किराणा, पाण्याचे ४ टँकर, भाडे, कपडे असा तीन खर्च येतो. शिक्षक अमोल पिंपळे, गोपाळ अवघड, दत्तात्रेय तळेकर, शिल्पा ढोणे, रामेश्वर तांबे, विठ्ठल केंद्रे, इब्राहिम पठाण असे २६ जण येथे सेवाव्रती आहेत.