आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवलीच्या दंगलीत 21 जण ठरले दोषी, 'बनायेंगे मंदिर’वरून झाली होती दंगल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- सेवली येथे बनायेंगे मंदिर ... या गाण्यावरून उसळलेल्या दंगल प्रकरणात २१ जणांवर दोष सिद्ध झाले असून येत्या सोमवारी त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. कोसमकर यांच्या कोर्टात गुरुवारी याप्रकरणी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. यात सरकार पक्षातर्फे नमूद आरोपींना १० वर्षे जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली. या वेळी न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.  
 
३ एप्रिल २००८ रोजी सायंकाळी सेवली येथे एका पानटपरीवर बनायेंगे मंदिर... हे गाणे लावल्यावरून किरकोळ वाद झाला होता. या वादाचे रूपांतर  दंगलीत होऊन दगडफेकीत अनेकजण गंभीर जखमी झाले. सार्वजनिक व खासगी मालमत्तेचेही नुकसान झाले होते. सेवली दंगलीचे पडसाद राज्यभर उमटल्यावर याठिकाणी संचारबंदी करण्यात आली होती. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या बळीराम जाधव व संतोष जवळकर यांचा  काही दिवसांनी मृत्यू झालेला अाहे. याप्रकरणी ४ एप्रिल २००८ रोजी वहीदखां पठाणसह इतरांविरुद्ध मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात  ३० जून २००८ रोजी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने या प्रकरणात सरकारपक्षातर्फे एकूण ३२ साक्षीदार तपासले तर आरोपीतर्फेसुद्धा एका पोलिस निरीक्षकाचा जबाब नोंदवण्यात आला.   
 
विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त: प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यात शासनाने विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. संजीव देशपांडे यांची नियुक्ती केलेली आहे. दरम्यान, गुरुवारी अॅड. देशपांडे यांनी सदरील प्रकरणात ३०२, ४३६ या कलमांसह १४९ कलम समाविष्ट करून सर्व २१ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, अॅड. संदीप घुगे यांनी सहकार्य केले.  
 
हे आहेत आरोपी: शेख अजीम शबीर कुरेशी (२९), शेख ख्वाजा शबीर कुरेशी (२२), अगाखान यासीनखा पठाण (३०), शेख बाबा शेख शबीर कुरेशी (३५), शेख सादीक बाबु शेख गणी (३०), खालेद अमिरोद्दीन काझी (३०),जमिरोद्दीन यमिरोद्दीन काझी (४५), शेख रियाज शेख गणी (५२), शेख जब्बार शेख दाऊद (४१), शेख मेहबूब पीर महंमद (५०), अबरारखां यासीनखां पठाण (४६), इलायसखां अहेमद खांं पठाण (३८), शेख सईद शेख मलंग पटेल (३१), शेख युसूफ शेख इब्राहीम (३६), अब्दुल रशीद अब्दुल अझीज (२८), शबीर रझाक कुरेशी (६५), शेख जुल्फेकार शेख मुनाफ (२८), शेख रशीद शेख लाल (३०), शेख युनूस शेख लालामियाँ तांबोळी (३५), शेख तस्लीम शेख रशीद (३५), शेख गौस शेख बाबुलाल कुरेशी (२६) अशी दोष सिद्ध झालेल्या आरोपींची नावे आहेत.   
पोलिसांचा फौजफाटा  
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे न्यायालय परिसर व सेवली येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. दरम्यान, जालना येथे न्यायालयात परिसरात कोर्ट पैरवी, स्थानिक गुन्हे शाखा, तालुका पोलिस ठाणे व पोलिस मुख्यालयातून अतिरिक्त मनुष्यबळ मागवण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक हालचालींवर पोलिसांची कडक नजर होती. तर न्यायालयाचा निकाल ऐकण्यासाठी आरोपींच्या नातेवाइकांची दिवसभर गर्दी होती.
बातम्या आणखी आहेत...