आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 22 Years College Student Death In Railway Crossing

हेडफोनच्या तालात गेला जीव, गाणी ऐकण्याच्या नादात रेल्वेगाडीखाली सापडून मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कानाला हेडफोन लावून गाणी ऐकण्याच्या नादात रेल्वेरूळ ओलांडताच नगरसोल नरसापूर एक्स्प्रेस रेल्वेखाली सापडून २२ वर्षीय कॉलेजकुमारला आपला जीव गमवावा लागला. ही घटना मंगळवारी दुपारी १२. ३० वाजता शिवाजीनगर परिसरात घडली. ऋषीकेश तुळशीराम लिंगायत असे मृताचे नाव आहे.

ऋषीकेश आणि त्याचा मित्र शिवाजीनगर भागातून जात होते. त्याच्या कानाला हेडफोन असल्यामुळे तो गाणी ऐकण्यात तल्लीन झाला होता. रूळ ओलांडताना त्याने गाडी येत असल्याचे पाहिलेच नाही. दरम्यान, एक्स्प्रेसखाली सापडला आणि त्याच्या शरीराचे चार तुकडे झाले. ही घटना पाहताच त्याच्या मित्राने पळ काढला. पोलिस पंचनाम्यात तो सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. मृताच्या नातेवाइकांनी सांगितले की, ऋषीकेश हा सकाळी ९.३० वाजता मित्रासोबत घराबाहेर पडला. घटना घडण्यापूर्वी त्याने हेडफोन लावलेला होता. त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी शेकडो लोक जमले होते. कुटुंबीय आणि नातेवाइकांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. काही वेळ त्याची ओळखच पटली नाही. शेवटी त्याच्या खिशातील आधार कार्ड, कॉलेजचे आयकार्ड, आयपॅड व पासपोर्ट फोटोवरून तो ऋषीकेश असल्याचे निष्पन्न झाले आणि एकच आक्रोश झाला. घटनास्थळी येण्यास पोलिसांना उशीर झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला.

२०११ ची घटना
१८ मे २०११ मध्ये अशाच प्रकारची घटना शिवाजीनगर रेल्वे रूळावर झाली होती. हेडफोन लावून जात असलेल्या सुनील सुरडकरला शेवटच्या डब्याचा धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झाला होता.

भाऊ आणि आई अॅडमिट
ऋषीकेशची घटना कळताच त्याचा लहान भाऊ आणि आई यांची प्रकृती खालावली. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋषीकेश शांत आणि गुणी असल्याचे त्यांचा घरमालक शेख अखिल यांनी सांगितले.