आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : औरंगाबादमधील 23 गावे बनणार मॉडेल व्हिलेज, अशा असतील तरतुदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद - स्मार्टसिटीच्या धर्तीवर खेडेगावांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी सरकारने मॉडेल व्हिलेज तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींमधील तेवीस गावांची निवड करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण गावे मॉडेल करण्यात येणार आहेत. 
 
केंद्रीय नगरविकास विभागाने शहरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्मार्ट सिटीची घोषणा करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. याच धर्तीवर ग्रामविकास विभागातर्फे मॉडेल व्हिलेज योजना सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत गावांचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पैठण तालुक्यातील धनीपूर ग्रामपंचायतीमधील पांग्रा, शिवनी, पैठणखेडा ग्रामपंचायतीतील चारगाव, केसापुरी, खंडेवाडी, नायगाव, हनुमंतगाव, म्हारोळा ग्रा., जांभळी ग्रा., चिंचोली, मेहेरबान नाईक तांडा, जांभळी वाडी, गंगापूर तालुक्यातील दहिगाव, मुरमी, सारंगपूर, जांभळा, पोटुळ, केकतवाडी, गिरणारा तांडा, कनकोरी ग्रा. मालुदा बुद्रुक, कोलघर, कासोडा लोकवस्ती ही २३ गावे मॉडेल व्हिलेज बनवली जाणार आहेत. 
 
अशा असतील तरतुदी : रस्तेविकास, शुद्ध पाणी, गावातच आरोग्य सेवा, वीज, हरित ग्रामनिर्मितीसाठी वृक्षलागवड, दर्जेदार शिक्षण सुविधा पुरवणे, शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार, गरीब, मध्यम आणि श्रीमंतांची वर्गवारी, ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी, विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणे, शेतीची सुपीकता वाढवणे, यांत्रिकीकरण अवजारे, तंत्रज्ञान, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आदी व्यवसाय सुरू करून उत्पादनात वाढ करणे, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साध्य करणे, मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणणे, बचत गटांना मदत करणे, प्रक्रिया उद्योग सुरू करून त्यांचा विकास साध्य करणे, असे उपक्रम राबवून मॉडेल व्हिलेज बनवले जाईल. 
 
15 ऑगस्टला घेणार आराखड्यास मान्यता
तीन महिन्यांपूर्वी राज्य शासनाच्या वतीने व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक, सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच एनजीओंच्या दोन अधिकाऱ्यांसह आठ जणांची समिती गठित केली आहे. जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष, तर सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदी समितीचे सदस्य आहेत. ही समिती गावात मुक्काम करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकास स्राेतांचा अभ्यास करून आराखडा तयार करत आहे. १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभेत आराखड्यास मान्यता घेऊन मान्यतेसाठी राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे. यानुसार मॉडेल व्हिलेज बनवले जाईल. 
 
स्वयंसेवी संस्था करणार मदत : यासाठीस्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात व्हिडिओकॉन कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. कंपनीचे निवडक व्यक्ती समितीमध्ये सहभागी करण्यात आले आहेत. राज्यभरात जिल्हा परिषदांसोबत विविध कंपन्या सहभाग देणार आहेत. गावाचा विकास आराखडा आणि अन्य नियोजनाबाबत कंपनीच्या स्वयंसेवकांना पुणे येथे यशदामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...