आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2308 Children Suffered Mulnutrition In Vaijapur Taluka

वैजापूर तालुक्यात 2308 बालके कुपोषणाच्या विळख्यात, शासकीय मदतीपासून लांब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडाळा - जानेफळ ते खंडाळा या पाच किमी परिसरात असणा-या आदिवासी भिल्ल समाजाच्या वस्त्यांवरील शून्य ते तीन या वयोगटातील 20 पेक्षा अधिक मुले कुपोषित असल्याचे आढळले आहे. दरम्यान, वैजापूर तालुक्यात 2308 बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली आहेत.


घरात अठराविश्वे दारिद्र्य व सतत पोटाची खळगी भरण्यासाठी करावी लागणारी भटकंती. यामुळे शासनाच्या विविध योजना तसेच मदतीपासून हे आदिवासी कायम वंचित राहतात. यामध्ये शासनातर्फे अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर मातेला व बाळाला देण्यात येणारा पोषण आहार व स्वच्छतेच्या माहितीबाबत हे आदिवासी बांधव अनभिज्ञ असल्याने त्यांच्या वस्त्यांवर विविध आजारांनी थैमान घातलेले आहे. खंडाळ्यापासून दोन किमी अंतरावरील बरमळा वस्ती येथे चाळीस आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथून जवळच असलेल्या भिलाटी वस्ती येथे 125 आदिवासी कुटुंबे राहतात. या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती, ऊसतोड व मासेमारी हा असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना सतत भटकंती करावी लागते. त्यांच्या भटकंतीमुळे त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया व लहान मुलांच्या संगोपनाकडे कायम दुर्लक्ष होते.


आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक
जानेफळ गावातील भिलाटी वस्ती येथे राहणा-या भीमराज मोरे यांना दीड महिन्याअगोदर जुळी मुले झाली. मात्र, ही दोन्ही मुले कुपोषित आहेत. तसेच तीन महिन्यांपूर्वी जन्मलेले रावसाहेब मोरे यांचे दोन अपत्यदेखील कुपोषित आहेत. या मुलांबरोबर अन्य जवळपास 20 मुले-मुलीदेखील कुपोषित असल्याचे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. मात्र, येथील नागरिक आपल्या पाल्याच्या व स्त्रियांच्या आरोग्याबाबतीत जागरूक नसल्याने आरोग्य प्रशासन व अंगणवाडी सेविका यांचे प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत.


अज्ञान व शिक्षणाचा अभाव
शासन स्तरावरून होणारी कुपोषणमुक्तीची जनजागृती वास्तविक या नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने येथे कुपोषणाचा फैलाव होत आहे. शासन कुपोषणमुक्तीसाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून माता बैठकी, गृहभेट आदींद्वारे जनजागृती करत आहे, परंतु येथील मुले अंगणवाडीपर्यंत जात नाहीत व घरातील महिला सकाळीच पतीबरोबर रोजगारासाठी घराबाहेर पडत असल्याने त्यांच्यापर्यंत कुपोषण मुक्तीचा संदेश पोहोचतच नाही.


आकडे काय बोलतात?
वैजापूर तालुक्यात मे 2013 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालात 27 हजार 117 अपत्ये साधारण श्रेणीत आहेत. त्यांची टक्केवारी 92.15 आहे. कमी वजनाचे एक हजार 863, तर अत्यंत कमी वजनामध्ये 445 बालके असल्याचे मे 2013 च्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. याच सर्वेक्षणानुसार तालुक्यात 2308 बालके कुपोषणाच्या विळख्यात आहेत.


योजना सक्षमपणे राबवण्याची गरज
आम्ही कुपोषणमुक्तीसाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून माता बैठकी व गृहभेटी कार्यक्रम राबवून जनजागृती करत असतो. आदिवासी क्षेत्रात आणखी जनजागृती कार्यक्रम सक्षम करण्याची गरज आहे.- महेश पाटील, एकात्मिक बाल विकास अधिकारी, वैजापूर


मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नाही
माझी मुलगी कुपोषित असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्याचे डॉक्टरने सांगितले आहे, परंतु मला आणखी चार मुले असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी पहाटेच मासेमारीसाठी जावे लागते. तेव्हा कुठे आमची घरची चूल पेटते. त्यामुळे मुलांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.
संजय सोनवणे, मुलीचे वडील