आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता कर उशिरा भरल्यास २४ % व्याज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यापुढे औरंगाबाद मनपा वर्षातून दोनदा मालमत्ता कराची वसुली करणार असून वेळेत कर भरणाऱ्यांना आता थोडे थोडके नव्हे, तर २४ टक्के व्याज द्यावे लागणार आहे. व्याजाचा हा भुर्दंड टाळण्यासाठी नागरिकांना दर सहा महिन्यांनी मनपाच्या कार्यालयांच्या खेट्या माराव्या लागणार आहेत. दुसरीकडे, व्याजाच्या धास्तीने नागरिक कर भरतील पण त्यांचा कर भरून घेण्यासाठी योग्य ती यंत्रणा मनपाकडे नसल्याने ताण वाढणारच आहे.

आतापर्यंत महापालिका मालमत्ता कराच्या नोटिसा वर्षातून एकदाच पाठवत असे. साधारणपणे डिसेंबर महिन्यात वाटप करून मार्चएंडपर्यंत वसुली असे स्वरूप होते. शिवाय विलंबाने मालमत्ता कर भरणाऱ्यांना त्यावर सरसकट १० टक्के व्याज आकारून कर भरणा केला जायचा. आता मुंबई प्रांतिक मनपा अधिनियमात मालमत्ता कर वसुलीबाबत करण्यात आलेल्या बदलांनुसार यात बदल करण्यात आला आहे. यापुढे दर सहा महिन्यांनी म्हणजे कॅलेंडर वर्षात दोनवेळा मालमत्ता कर दोन टप्प्यांत वसूल केला जाणार आहे. अशा प्रकारच्या नोटिसांचे वाटपही मनपाने सुरू केले आहे. केवळ एवढाच बदल नसून उशिरा कर भरणाऱ्यांच्या व्याज आकारणीतही मोठी वाढ करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार आता थेट वर्षाच्या अखेरीस मालमत्ता कर भरला तर महिना टक्के दराने म्हणजेच दरसाल २४ टक्के दराने व्याज आकारून त्यासह मालमत्ता कर वसूल केला जाणार आहे.

काय होणार परिणाम : मुख्यकर संकलक शिवाजी झनझन यांनी सांगितले की, व्याजदर अधिक असल्याने नागरिक वेळेवर कर भरणा करतील, अशी आशा आहे. शिवाय वर्षातून दोनदा करवसुली होणार असल्याने महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. दुसरीकडे नागरिकांना मात्र कर भरणा करण्यासाठी वर्षातून दोनदा महापालिकेच्या चकरा माराव्या लागतील. ही यातायात सहन करणाऱ्या नागरिकांसाठी कर भरण्याची सुविधा मनपाने उपलब्ध करून दिलेली नाही.

आता नोटिसांचे वाटप सुरू : झनझन म्हणाले की, शहरात एकूण लाख ९३ हजार मालमत्तांची मनपाकडे नोंदणी आहे. त्याशिवाय आगामी काळात साताऱ्यांतील २९ हजार ५०० मालमत्तांची भर पडणार आहे. शहरात १९ हजार ८०० व्यावसायिक मालमत्ता आहेत. या पैकी व्यावसायिक मालमत्ताधारकांना मनपाने नोटिसा दिल्या आहेत जवळपास ३० टक्के निवासी मालमत्ताधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
वसुलीवर जोर
झनझन म्हणाले की, महापालिकेचे १०० कर्मचारी वसुलीच्या कामात आहेत. याशिवाय इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. स्मार्ट सिटीसाठी वसुलीचे उद्दिष्ट गाठणे अत्यावश्यक असून आता वसुली विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार रोखून धरण्यात येतील. त्यांनी योग्य काम केले तरच त्यांना पगार दिला जाईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.