आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात चोवीस तासांत ३४ मि.मी. बरसला; आणखी चार दिवस पाऊस, तापमान ११ अंशांनी घसरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शुक्रवारी सायंकाळ ते शनिवारी सायंकाळपर्यंत पडलेल्या ३४ मि.मी. पावसाने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते आणखी चार दिवस (१९ नोव्हेंबरपर्यंत)हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी कमाल तापमानात ११ अंश सेल्सियसने घट झाली. ३३ अंशावरुन ते २२ अंश सेल्सियसपर्यंत घसरले. पुढील चार दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात स्थलनिहाय पावसात मोठा फरक आहे. सोयगाव ३५.३३, कन्नड ३०.५०, पैठण २५.८०, गंगापूर २३.३३ आणि फुलंब्री तालुक्यात २२.७५ मि.मी. पाऊस पडला. या पावसाने दुष्काळाची दाहकता थोडी कमी केली आहे. पेरणी झालेल्या ज्वारीच्या २६ टक्के क्षेत्राला जीवदान मिळाले.

यंदा थंडीसह पाऊसही
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये पाऊस नव्हता. शनिवारी कमाल तापमानात १०.६ अंशांनी घट होऊन ते २२.४ अंशापर्यंत घसरले. पुढील ४ दिवसांत कमाल तापमान २२ ते २६ अंश राहील व पाऊसही पडेल, असा अंदाज आहे.

बचत गटांची दाणादाण : तापडिया कासलीवाल मैदानावर बचत गटांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून शनिवारी दिवसभर झालेल्या रिपरिपीमुळे बचत गटांची दाणादाण उडाली. मंडपामध्ये सर्वत्र पाणी साचले होते. मंडपातून पाणी गळत असल्याने सर्व साहित्य भिजले. शिवाय प्रदर्शनाकडे नागरिक फिरकलेदेखील नाहीत.

पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागराच्या पृष्ठभागातील पाण्याचे तापमान तीन केल्व्हिन्सने वाढून ३०२ केल्व्हिन्सवर पोहोचले. तसेच अरबी समुद्रावर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे
बंगालच्या उपसागरावर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस पडत आहे. आणखी चार दिवस ढगाळ वातावरण व पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर वातावरण निवळेल व थंडीचा जोर वाढेल.
पंढरीनाथ पाटील, सहायक हवामान शास्त्रज्ञ, चिकलठाणा वेधशाळा.

शहरातील पाऊस
24.00 औरंगाबाद
13.00उस्मानपुरा
27.00भावसिंगपुरा
33.00 कांचनवाडी
२३.00 हर्सूल
शनिवारी ढगाळ वातावरण हाेते.
फायदा काय?
* भूजल पातळी, प्रकल्पातील जलसाठा टिकवून ठेवण्यासाठी
* गहू, ज्वारी, हरभरा, करडई, मका या रब्बी पिकांसाठी उपयुक्त.
तोटा काय?
* ढगाळ वातावरण व पावसामुळे तूर, मोसंबी, डाळिंब, आंबा आदींसाठी हानिकारक.
* फुलोरा उशिरा लागून फळ बाजारात येण्यासाठी विलंब.
* दर्जा, पोषकतेवरही परिणाम होईल.
* (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांच्या माहितीनुसार)