आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2400 Kg Fertilizer Produces Through Food Wastage

खरकट्यातून तयार होईल वर्षाला २४०० किलो खत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडको कॅनॉट गार्डन येथील महिलांनी आपापल्या अपार्टमेन्टच्या गच्चीवर दोन खत प्रकल्प तयार केले आहेत. महिलांनी वर्गणी गोळा करून खत तयार करण्यासाठी बाजारातून ड्रम, भुसा, माती अन् नारळाच्या काथ्या आणल्या. घरातील खरकट्या अन्नापासून वर्षाला २४०० किलो खत तयार करण्याची सुरुवात केली आहे.

‘सहाकारातून समस्यामुक्ती’ या ‘दिव्य मराठी’च्या अभियानांतर्गत सिडको कॅनॉट परिसरातील महिला मंडळाने सक्रिय सहभाग घेत अनेक उपक्रम सुरू केले आहेत. यात स्वच्छता अभियान, बायोगॅसनिर्मिती आणि आता कंपोस्ट खताचा प्रकल्प सुरू केला आहे. या भागातील महिलांनी एकत्र येत शहरातील विविध भागातील तज्ज्ञांच्या भेटी घेऊन कंपोस्ट खतनिर्मितीची महिती घेतली. बी. डी. भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच घराच्याच गच्चीवर ड्रममध्ये कंपोस्ट खत तयार करण्यास सुरुवात केली आहे. दिशा अलंकार व साई आर्केड या दोन सोसाटीच्या महिलांनी हे पाऊल उचलले आहे.

वर्गणीतून आणले ड्रम
या भागातील पन्नास महिलांनी एकत्र येत दोन वसाहतीत कंपोस्ट खत प्रकल्प तयार करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातील त्यांनी खत तयार करण्यासाठी ४०० रुपयांना एक या दराने ड्रम विकत आणले. यासाठी महिलांनी वर्गणी गोळा केली. दोन्ही साेसायट्यांनी प्रत्येकी तीन ड्रम खरेदी केले आहेत.

खरकट्यातून निर्मिती
दिशा अलंकार कॉम्प्लेक्समधील पंधरा ते वीस महिलांनी आपापल्या घरातील खरकटे अन्न गच्चीवरच्या एक प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यात खाली थोडा मातीचा थर नंतर खरकटे अन्न. नंतर पुन्हा मातीचा थर तयार करून खताची निर्मिती सुरू केली. काही महिलांनी आपल्या घरात साठवून ठेवलेल्या नारळाच्या काथ्याही ड्रममध्ये टाकल्या आहेत.

२४०० रुपयांत खत
एका कॉम्प्लेक्सच्या गच्चीवर तीन ड्रम ठेवले आहेत. चा‌ळीस दिवसांत किमान पन्नास किलो खत तयार होईल तर वर्षभरात दोन्ही कॉम्प्लेक्स मिळून किमान २४०० किलो खत तयार होईल, असा अंदाज महिलांना आहे. त्यासाठी प्लास्टिकचे ड्रम, माती आणण्यासाठी दोन्ही मिळून २४०० रुपये खर्च आला आहे.

महिनाअखेर मिळेल खत
दिशा अलंकार व साई आर्केड या दोन्ही इमारतीतील महिलांनी कंपोस्ट खताचे प्रकल्प सुरू केले आहेत. सर्वच महिला उत्साहाने काम करीत आहेत.खताची पहिली बॅच एप्रिलअखेर तयार हाईल तोपर्यंत आम्ही इतर इमारतीत खत तयार करण्याचे प्रशिक्षण देत आहोत.
स्वाती स्मार्थ, गृहिणी, सिडको कॅनॉट
छायाचित्र: खतनिर्मितीची प्रक्रिया आणि नियम समजून घेताना कॅनाॅटमधील गृहिणी.