Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | 244 Buses for Girls Student in Maharashtra

मुलींसाठी आणखी 244 बसेस; राज्यातील 122 तालुक्यांत विद्यार्थिनींना मिळणार लाभ

प्रतिनिधी | Update - May 09, 2014, 02:51 AM IST

मानव विकास मिशनतर्फे राज्यातील 122 तालुक्यांतील मुलींसाठी आणखी 244 बसेस देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

 • 244 Buses for Girls Student in Maharashtra
  औरंगाबाद - मानव विकास मिशनच्या अंतर्गत राज्यातील 122 तालुक्यांतील मुलींसाठी आणखी 244 बसेस देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 49 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी जास्तीच्या बसेस मिळणार असल्याची माहिती मानव विकास मिशनचे आयुक्त भास्कर मुंडे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
  ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाता यावे यासाठी मानव विकास मिशनच्या वतीने बसेसची व्यवस्था केली जाते. बर्‍याचदा शाळेत जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे मुलींना अर्धवट शिक्षण सोडावे लागते. त्यामुळे मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी मानव विकास मिशनच्या वतीने या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
  राज्यात 244 बसेस या मानव विकास मिशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबत ‘दिव्य मराठी’ला माहिती देताना मुंडे यांनी सांगितले की, साधारण 20 लाख रुपयांची ही बस आहे. मानव विकास मिशनअंतर्गत येणार्‍या 125 तालुक्यांपैकी बीड जिल्ह्यातील वडवणी तसेच अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, अंधारी या तालुक्यांचा अपवाद वगळता राज्यातील 122 तालुक्यांना मानव विकास मिशनच्या माध्यमातून प्रत्येकी दोन बसेस देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 48 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी एसटी महामंडळाला देण्यात येणार आहे. महामंडळाकडून एसटी खरेदी संदर्भातील प्रस्ताव मानव विकास मिशनकडे आल्यानंतर त्यांना हा निधी देण्यात येणार असल्याचे मुंडे म्हणाले.
  75 हजार मुलींचा प्रवास, ‘एसटी’चाही फायदा !
  मानव विकास मिशनच्या अंतर्गत राज्यात सध्या 625 बसेस धावत आहेत. या माध्यमातून दररोज 75 हजार मुली प्रवास करत आहेत. 7 ते 12 वी पर्यतच्या मुलींना या बसच्या सुविधेचा फायदा मिळतो. मुलींसाठी ही बस मोफत आहे. यामध्ये मानव विकास मिशनच्या वतीने एसटी महामंडळाला वर्षाकाठी एका बससाठी सात लाख रुपये दिले जातात. तर मुलींच्या शाळेच्या वेळेव्यतिरिक्त महामंडळाला या बसमधून प्रवासी वाहतूकही करता येत सअल्याने महामंडळालादेखील फायदा होत असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
  मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यास मदत
  या 244 बसेसमुळे ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी जास्तीच्या सुविधा निर्माण होतील. बर्‍याचदा वाहतुकीच्या सुविधा नसल्यामुळे मुलींचे घरी बसण्याचे आणि कमी वयात लग्न होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळत असल्यामुळे राज्यात सर्वाधिक प्रतिसाद या योजनेला मिळत आहे. त्यामुळे लोकांच्या मागणीनुसारच बसची संख्या वाढवली आहे. त्यामुळे मुलीच्या शिक्षणाच्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होईल.
  भास्कर मुंडे, आयुक्त, मानव विकास मिशन

Trending