आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या निर्मितीसाठी २५ कोटींचा प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मध्यवर्तीबसस्थानकाची इमारत जीर्ण झाली आहे. प्रवासी आणि बसेसची संख्याही वाढली आहे, पण इमारतीचा विस्तार झाला नाही. त्यामुळे सण, महोत्सव आणि लग्नसराईत बसस्थानकात गर्दीमुळे पाय ठेवायला जाग राहत नाही. पावसाळ्यात इमारतीचे छत गळत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामध्ये बदल करण्यासाठी स्मार्ट सिटीला शोभेल असे नवीन मॉडेल बसस्थानक उभारण्यासाठी एसटी प्रशासनाकडून २५ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो विभागीय आयुक्त शासनाला पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच बांधकामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी दिली.
मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्राशी औरंगाबाद बसस्थानक जोडलेले आहे. दररोज दोनशेवर बस येथून धावतात. १५ हजारांवर प्रवासी येथून ये-जा करतात. प्रवाशांच्या तुलनेत प्लॅटफॉर्मची संख्या तोकडी आहे. खेडीपाडी, तांडे आणि वस्त्यांशी बसचे जाळे जोडण्यात आले आहे. त्यासाठी बसची संख्या वाढवण्यात आली आहे. पुणे, मुंबईसाठी शिवनेरी व्हॉल्व्हो अशा १४ बस धावतात. बसस्थानकावर या बसेस दाटीवाटीत लावाव्या लागतात. कोणती बस कुठे लागली, हे प्रवाशांना कळत नाही. त्यामुळे एकाच बसमध्ये गर्दी होते, तर दुसरी बस रिकामी धावते. परिणामी, त्याचा फटका प्रवाशांबरोबरच एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होतो.
प्रवाशांना समाधानकारक सुविधा मिळत नसल्याने ते खासगी बसने प्रवास करणे पसंत करतात. यामध्ये बदल करण्यासाठी आणि स्मार्ट सिटीला शोभेल अशा मध्यवर्ती बसस्थानक निर्मितीसाठी अनेक वर्षांपासून कागदी घोडे नाचत आहेत. मात्र, आता कार्यवाही होण्याचे संकेत असून विभागीय आयुक्तांनी तसा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना महामंडळाला केल्या होत्या. त्यानुसार खर्चाच्या अंदाजपत्रकाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी तयारी
मंत्रिमंडळाच्याबैठकीपूर्वी विविध विभागांकडून विकास आराखड्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. बसस्थानक परिसरात आधुनिक सुविधांनी युक्त इमारत उभारण्यासाठी २५ कोटींचा प्रस्ताव एसटी महामंडळाने प्रशासनाकडे पाठवला आहे. जुनी इमारत पाडून नवी इमारत उभी करण्यासाठी २५ कोटींचा प्रस्ताव एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास बसस्थानकावरील प्लॅटफॉर्मची संख्या दुपटीने वाढणार आहे. तसेच बस डेपोचेदेखील आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यापूर्वीदेखील एसटीकडून बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत, परंतु वरिष्ठ कार्यालयांकडून हे प्रस्ताव थंड बस्त्यात पडले आहेत.
बातम्या आणखी आहेत...