आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी पाडव्याला दोनशे गृहप्रवेश, 250 घरांचे बुकिंग; गृह प्रकल्पांचा बाजार सावरला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रिअल इस्टेटच्या बाजारात दिवाळीनिमित्त झळाळी आली असून यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल २०० गृहप्रवेश निश्चित झाले आहेत, तर २५० जणांनी घरांचे बुकिंग केले अाहे. स्वप्नातील घर साकारण्यासाठी लाखांपासून १.५ कोटी रुपयांचे पर्याय असून लगेच राहता येतील, असे शहराच्या चारही बाजूंनी अनेक प्रकल्प तयार आहेत.
 
रेरा आणि जीएसटीमुळे भविष्यात उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांच्या किमती वाढणार असल्याने विद्यमान प्रकल्पातून आपले घर निवडण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. प्रथम घर खरेदी करणाऱ्यांना पंतप्रधान अावास योजनेतील लाख ७० हजार रुपयांचे अनुदान आणि गृहकर्ज सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी दिली. 
गेले वर्षभर नाेटबंदी, जीएसटी आणि रेरामुळे ग्राहकांच्या मनात गृह खरेदीबाबत संभ्रम होता. 

गेल्या महिन्यात आयोजित क्रेडाई ड्रीम होम्स प्रदर्शनात ग्राहकांनी संभ्रम दूर करून घेतले आणि दसऱ्यातच तब्बल ११० घरांची बुकिंग झाली. वर्षभराच्या मंदीतून सावरलेल्या बाजारात दसऱ्याला ग्राहकांची पावले वळली. दिवाळीनिमित्त येथे उत्साह दिसून येत आहे. पंतप्रधान अावास योजनेअंतर्गत पहिल्यांदा घर घेणाऱ्यांना लाख ७० हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध आहे, तर बँकांच्या गृह कर्ज सुविधेमुळे घराचे स्वप्न साकारणे सहज शक्य होत असल्याची माहिती युनिक डेव्हलपर्सचे संचालक प्रमोद मुथा यांनी दिली. 
 
१.५ कोटी रुपयांपर्यंत पर्याय : शहराच्याचारही बाजूंनी गृह प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. पैैठण रोडवर उच्चभ्रू वसाहत उभी राहत आहे, तर बीड बायपास आणि हर्सूल सावंगीकडे मध्यमवर्गीयांना परवडतील असे गृह प्रकल्प तयार आहेत. शेंद्रा, चिकलठाणा, वाळूज, तिसगाव भागात उद्योग क्षेत्रातील कामगारांना परवडतील असे गृह प्रकल्प तयार आहेत. ग्राहकांना आपल्या आवडीचे घर घेण्यासाठी लाख रुपयांपासून १.५ कोटी रुपयांपर्यंत पर्याय उपलब्ध असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईच्या औरंगाबाद चॅप्टरचे अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी दिली. यात फ्लॅट, बंगलो, रो-हाऊस आणि प्लॉटचा समावेश आहे. 
 
सर्वाेत्तम वेळ 
घरघेण्यासाठी ही सर्वाेत्तम वेळ असल्याचे लक्षात आल्याने ग्राहकांची पावले रिअल इस्टेटच्या कार्यालयाकडे वळू लागली आहेत. औरंगाबादकरांची क्रयशक्ती वाढली असून ते पुणे-मुंबईप्रमाणे अमेनिटीज, उच्चभ्रू लाइफस्टाइलच्या घरांना पसंती देत आहेत. 
- रमेश नागपाल, संचालक, नागपाल ग्रुप 
 
ग्राहकांना होणार फायदा 
दसऱ्यापासूनरिअल इस्टेटमध्ये आलेले चैतन्य कायम आहे. तयार घरे उपलब्ध असल्याने ग्राहकांना वेटिंगची गरज पडत नाही. बेस प्राइसमध्ये उपलब्ध असल्याने ग्राहकांना फायदा होत आहे. यामुळे ग्राहक वर्दळ वाढली आहे. 
- रवी वट्टमवार, अध्यक्ष, क्रेडाई 
 
२०० गृहप्रवेश निश्चित होतील 
पाडव्यानिमीत्तशहरातील २०० नागरिक हक्काच्या घरात प्रवेश करतील, तर घराची माहिती घेऊन गेलेल्या सुमारे २५० जणांनी बुकिंग केली आहे. येणाऱ्या काळात यापैकी मोठ्या संख्येने गृहप्रवेश होतील, असे वट्टमवार यांनी सांगितले. 
 
घरांना मागणी येण्याची तीन कारणे : तब्बल ४० वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात असणारे नागपाल ग्रुपचे संचालक रमेश नागपाल यांनी औरंगाबादच्या बांधकाम व्यवसायाला झळाळी येण्याची तीन कारणे सांगितली. गेल्या वर्षांत मागणी नसल्याने अनेक प्रकल्प रिकामे आहेत. ते प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच्याच बेस प्राइसमध्ये उपलब्ध आहेत. रेरा आणि जीएसटीमुळे नवीन प्रकल्पांच्या किमती वाढणार असल्याने विद्यमान प्रकल्पांत ग्राहकांचा फायदा आहे. पुण्याच्या तुलनेत औरंगाबादेतील गुंतवणूक कमी वेळेत अधिक परतावा देणारी आहे. तिसरे म्हणजे येथे पुण्यापेक्षा रेंटल व्हॅल्यू म्हणजेच घरभाडे अधिक मिळते. घरात गुंतवणूक करून ते भाड्याने दिले तर चांगली रक्कम मिळते. 
बातम्या आणखी आहेत...