आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन पुलांच्या कामांसाठी चार दिवसांत २६ कोटी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बारापुल्लागेट, मकई गेट पाणचक्की गेट या तीन ठिकाणच्या पुलांचा प्रलंबित प्रश्न एकदाचा मार्गी लागला असून चारच दिवसांत या पुलांसाठी २६ कोटींचा निधी मिळणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत केली.

शहरातील बारापुल्ला, मकई गेट आणि पाणचक्की या ठिकाणी तीन पुलांचा प्रस्ताव मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर पालकमंत्र्यांनी बांधकाम विभागाचे अतिरिक्त सचिव अनंत कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा करत येत्या चारच दिवसांत या पुलांसाठी २६ कोटी रुपयांचा निधी मिळेल, असे ते म्हणाले. शहरातल्या मकई गेट, बारापुल्ला आणि पाणचक्की या तिन्ही पुलांचा विषय सातत्याने चर्चेत येत होता. मात्र, त्यावर आतापर्यंत कोणतीच कार्यवाही होत नव्हती. तत्कालीन आमदार प्रदीप जैस्वाल यांनी विधानसभेतदेखील प्रश्न उपस्थित केला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामासाठी २३ कोटींचा निधी देण्याला तत्त्वत: मान्यता दिली होती, पण एक रुपयाही आला नाही. यानंतर गेल्या वर्षी अल्पसंख्याकमंत्री एकनाथ खडसे यांनीदेखील त्यासाठी मदत देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही झाली नव्हती. आता हे काम मार्गी लागणार आहे.

कचरा गाड्यांसाठी कोटी
पालकमंत्र्यांनी कचरापेट्यांसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, चार महिने झाल्यानंतरही त्यावर कारवाई झाली नव्हती. नवीन आयुक्त आल्यानंतर त्यांनी कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी गाड्या देण्यात याव्यात याबाबतचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी एक कोटी रुपये मंजूर केले. तसेच आवश्यकता लागल्यास आणखी निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नियोजन समितीमधून मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी चार कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र, आठ महिने झाल्यानंतरही हा निधी खर्च करण्यात आला नव्हता. पण नव्या आयुक्तांनी पंधरा दिवसांतच याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे मुक्तिसंग्रामाच्या उर्वरित कामालाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी आयुक्त केंद्रेकर चांगले काम करत आहेत. मनपाच्या कारभाराची घाण साफ करत आहेत. त्यामुळे त्यांना तीन वर्षे ठेवण्यात यावे याबाबतचा ठरावा मांडावा, अशी मागणी केली. त्यानंतर आमदार इम्तियाज जलील यांनी त्यांना नागपूरला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांना औरंगाबादमध्येच ठेवण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानंतर कदम म्हणाले की, आयुक्त चांगले काम करत आहेत. त्यामुळे मी स्वत: आयुक्त तीन वर्षे मनपात राहावेत यासाठी मुख्यमंत्र्यांकडे या विषयावर बोलणार अाहे. त्यामुळे ना नागपूर ना कोकण, आयुक्त औरंगाबादमध्येच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एखाद्या अधिकाऱ्यांना तीन वर्षे ठेवण्यात यावे यासाठीचा ठराव पहिल्यांदाच मांडण्यात आला आहे. याबाबतचे इतिवृत्त तयार केल्यानंतर नियोजन समितीचा हा ठराव संबंधित विभागाकडे पाठवण्यात येतो.

वाहतुकीचा प्रश्न सुटणार
बारापुल्लागेट, मकई गेट पाणचक्की या तिन्ही ठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सातत्याने या ठिकाणी पर्यायी पुलाच्या उभारणीची मागणी होत होती. आता यासाठी निधी मिळणार असल्यामुळे पुलाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आगामी काळात या भागातली वाहतूक कमी होण्यास मदत मिळणार आहे.

मनपाची वसुली वाढणार
मनपाची मालमत्ता कराची वसुली फक्त १८ टक्के इतकी आहे. त्यामुळे मनपाला कोणतेही काम करावयाचे असल्यास निधीची मागणी करावी लागते. मात्र, मालमत्ता कराची ही वसुली वाढवण्याचे फारसे प्रयत्न झाले नाहीत. शहरातल्या हजारो घरांना कर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे या घरांना कर लावल्यास मालमत्ता करामध्येदेखील वाढ होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्रेकरांना तीन वर्षे मनपात ठेवा
औरंगाबादच्या महानगरपालिकेसाठी चांगले काम करणारा आयुक्त मिळाला आहे. त्यामुळे त्यांना तीन वर्षे मनपा आयुक्तपदी राहू द्यावे, असा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. याबाबत आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून त्यांना इतरत्र कुठे जाऊ देणार नसल्याची माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.