औरंगाबाद; शहरात अवैधरीत्या विक्रीसाठी आणलेला २६ लाख ५२ हजारांचा गुटखा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी जप्त केला. एकूण ४५ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. हरिवर बाळकृष्ण मांडके (२५), सच्चिदानंद बापूराव जाधव (३५, रा. गोडसे कॉलनी, वडुजगाव, ता. खटाव, जि. सातारा), शेख नदीम शेख नईम (२५, रा. हर्सूल टी पॉइंट), दुकानदार अमोल इम्रतलाल बटिया (३४, रा. सुराणानगर) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा आणि क्रांती चौक ठाण्याच्या विशेष पथकाने केली.
गुटखा विक्रीसाठी शहरात आणला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी सूत्रे हलवली. एमएच ०४ ईएल ३८७८ या ट्रकमधून रेल्वेस्टेशनमार्गे तो शहरात आणला होता. पोलिसांनी सापळा रचत ट्रक पकडला. गुटखा कर्नाटकातून आणला आहे. गुटखा खरेदी करणारा दुकानदार बुलेट गाडीवर घटनास्थळी दाखल झाला. पण पोलिसांनी त्याला जागेवरच अटक केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे, अशोक आव्हाड, उपनिरीक्षक अन्वर, दीपक कोलमे, संतोष हंबर्डे, सातारा ठाण्याचे हवालदार गायकवाड यांनी ही कारवाई केली.
मुद्देमाल जप्त
याकारवाईत २६ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १० लाखांचा ट्रक, आठ लाख रुपये रोख, दीड लाख रुपये किमतीची बुलेट, १४ हजार रुपयांचे मोबाइल असा माल जप्त करण्यात आला. पकडलेला गुटखा हा हिरा कंपनीचा असून ३०० गोण्यांत तो भरलेला होता.
गुटखा किंग कोण?
सरकारनेगुटखा विक्रीला बंदी घातली तरी छुप्या मार्गाने गुटखा विक्री सुरू आहे. त्यामुळे शहरातील गुटखा किंग कोण? याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. यामध्ये पैठण गेट येथील राज प्रोव्हिजनचे सय्यद, वसीम, एसआरटी ट्रान्सपोर्ट हैदराबादचे राजू सेठ आणि गाडीमालक रमेश सेठ यांचा समावेश आहे.
जप्त केलेली गुटख्यांची पोती क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या पार्किंगमध्ये अशी रचून ठेवण्यात आली आहेत. छाया : मनोज पराती.