आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपड्यांवरून कळाले समुद्रमार्गे आले २६/११ चे अतिरेकी, माजी संचालकांनी दिली माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- थर्ड डिग्रीसमोरही काही आरोपी बोलते होत नाहीत. अशा निगरगट्टांसमोर पोलिसांनाही हात टेकावे लागतात. तेव्हा तपासाला गती मिळते ती फॉरेन्सिक लॅबमध्ये झालेल्या संशोधनामुळे. अवघ्या जगाला हादरवून टाकणाऱ्या २६/११ च्या हल्ल्यासाठी दहशतवादी समुद्रमार्गे आले होते. हे रहस्यही एका शर्टमुळे उलगडले.
टच डीएनए टेस्टच्या माध्यमातून हल्लेखोर बोटीतून आल्याचे स्पष्ट झाले आणि तपासाला गती मिळाली, अशी खास माहिती मुंबई न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे माजी संचालक डॉ. एम. व्ही. गरड यांनी दिली.

रविवारी त्यांनी दै. दिव्य मराठी कार्यालयाला भेट दिली. या वेळी तपास कसा केला जातो, हे सांगताना अनेक महत्त्वाच्या बाबींवर प्रकाशझाेतही टाकला.ते म्हणाले, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजेच फॉरेन्सिक लॅबमध्ये कार्यरत संशोधकांसमोर पडद्यामागील सत्य उलगडण्याचे आव्हान असते. मृतदेहालाही बोलायला भाग पाडणाऱ्या या संशोधकांचा गुन्ह्याच्या तपासात सिहांचा वाटा असतो. डॉक्टर, पोलिसांसह गुन्ह्यांच्या तपासात फॉरेन्सिक लॅबची भूमिका खूपच महत्त्वाची ठरते. व्हिसेरा, कपडे, हत्यारे, रासायनिक पदार्थ असे चाचणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे घटक पोलिसांनी वेळेत प्रयोगशाळेत दिले तर गुन्ह्याची उकल करणे सोपे ठरते.

मुंबईवरील भीषण हल्ल्याचा तपास करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. घाटकोपरमधील प्रकरणही उत्कंठा वाढवणारे होते. तिथे एका टॅक्सीत बॉम्बस्फोट झाला होता. सर्वत्र ऑइलसारखा पदार्थ असल्याने प्रथम ते दूर करावे लागले. त्यानंतर त्याची चाचणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रज्ञासिंग ठाकूर यांची नार्को टेस्ट केली. नागपूर येथील बहुचर्चित अनिता चांडक खून प्रकरणात मारेकऱ्यांचा तपास करताना नखातील छोट्याशा रक्ताच्या नमुन्यातून सत्य जगासमोर आणता आले, अशा विविध घटनांच्या तपासात प्रयोग शाळेतील संशोधन महत्त्वपूर्ण ठरले.

याबाबी ठरतात महत्त्वाच्या
जळीतकपडे, विषबाधा, व्हिसेरा, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, रक्ताचे नमुने, ठसे आदी बाबी तपासात महत्त्वपूर्ण ठरतात. रासायनिक पदार्थाचा विश्लेषणात्मक रिपोर्ट पाठवला जातो. त्याआधारे पोलिस तपास करतात. त्यानंतर डॉक्टर, पोलिस गुन्ह्याची उकल करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचतात. कोणत्या स्फोटकांचा वापर झाला हेही तपासातून सिद्ध होते. मुंबई हल्ल्यात एके ४७ चा वापर झाल्याचेही चाचणीतून उघड झाले होते, असेही डॉ. गरड यांनी सांगितले.

लवकरच नांदेडमध्येही प्रयोगशाळा
न्यायसहायकवैज्ञानिक प्रयोगशाळेचे मुंबईत मुख्यालय असून नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे येथे विभागीय प्रयोगशाळा आहेत. गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता कोल्हापूर आणि नांदेड येथेही लवकरच प्रयोगशाळा सुरू होत आहे.

सायबर क्राइमलाही पायबंद
सायबरगुन्हे रोखण्यासाठीही अनेक टेस्ट आहेत. अशा गुन्ह्यात हार्ड डिस्क, सिम कार्ड, सीडी महत्त्वपूर्ण ठरतात. यातील मजकूर डिलिट केल्यानंतरही तो परत मिळवता येतो. त्यातूनच गुन्ह्यांना पायबंद घालण्यात मदत होते.

नार्को चाचणीसाठी आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. आरोपींना गुन्ह्याच्या संदर्भात अाडवेतिडवे प्रश्न विचारले जातात.

मानासपोचार तज्ज्ञ ग्राफस्टडी करतात. एक्स्पर्टने प्रश्न विचारताच समोरील व्यक्तीचे वर्तन, रक्तदाबाचे प्रमाण अन् चेहऱ्याच्या सूक्ष्म हालचालींची नोंद घेतली जाते.
न्यायालयाने परवानगी दिली तर लाय डिटेक्टर टेस्टही घेतली जाते. ब्रेन इलेक्ट्रिक्ल टेस्ट केली जाते.

मात्र, शारीरिक क्षमता तपासल्याशिवाय कोणतीच टेस्ट घेतली जात नाही. या टेस्टमधून सत्य समोर येऊ शकते, काही वेळा अपयशही येते.

गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही महत्त्वाची माहिती देतात. त्याच बंदुकीतून गोळी झाडली गेली किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी गोळ्या झाडून अहवाल तयार केला जातो. कसाबच्या रायफलचीही गोळ्या झाडूनच टेस्ट घेण्यात आली होती. सत्य शोधताना संशोधकाचा कस लागतो.