आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, शुल्क सवलतीची लोभने तरीही 2633 जागा रिक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्य सरकारच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी महाविद्यालयांची खिरापत वाटल्याने शहरातील 16 महाविद्यालयांमधील 2633 जागा रिक्त राहिल्या आहेत. 7 हजार 449 जागांपैकी रिक्त राहिलेल्या जागा आता 10 ऑगस्टपर्यंत व्यवस्थापन कोट्यातून भरण्याचे महाविद्यालयांसमोर आव्हान आहे.

पाच वर्षांपूर्वी अभियांत्रिकीला प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना अथक पर्शिम करावे लागत होते. अलीकडच्या काळात महाविद्यालयांची संख्या वाढली. शिवाय असंख्य पदवीधर बेरोजगार असल्यामुळे अभियांत्रिकीकडे जाण्याची स्पर्धा कमी झाली आहे. तसेच 11 वी 12 ला चांगले गुण मिळाल्यानंतर तंत्रनिकेतनला प्रवेश घेऊन नंतर अभियांत्रिकी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

मराठवाड्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 13 हजार 700 जागा असून त्यापैकी 4 हजार 500 जागा रिक्त आहेत. पहिल्या आणि दुसर्‍या फेरीनंतर झालेल्या समुपदेशनात मराठवाड्यातील केवळ 96, तर शहरातील विविध महाविद्यालयांतील 89 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. दहा ऑगस्टपर्यंत राज्यातील खासगी महाविद्यालयांत व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे. खासगी महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क 60 हजार रुपयांपासून पुढे आहे.

आर्थिक घडी विसकटली

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षातील प्रवेश कमी झाल्यामुळे महाविद्यालयांचे आर्थिक गणित बिघडले आहे. एआयसीटीच्या नियमानुसार 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनिवार्य आहे. शिवाय विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवणे गरजेचे आहे. राज्यात अभियांत्रिकीची सुमारे 800 महाविद्यालये आहेत. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक महाविद्यालयांनी शुल्क टप्प्यांत भरण्याची सवलत उपलब्ध केली आहे, तर काही महाविद्यालयांकडून लॅपटॉप, वायफाय कॅम्पस आणि नोकरीच्या हमीची आश्वासने दिली जात आहेत. तथापि विद्यार्थी संख्या घटल्याने महाविद्यालये चालविण्याचे आव्हान संस्थाचालकांपुढे उभे राहिले आहे.

स्थानिक विद्यार्थ्यांना फटका
तीन वर्षांपर्यंत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा राखीव होत्या. त्यामुळे कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना माफक शुल्कात प्रवेश मिळत होते. मात्र, आता महाविद्यालय स्वायत्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार महाविद्यालय निवडावे लागत आहे.

प्रवेश प्रक्रिया सोपी असावी
अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत लवचीकता आणने आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना संस्था किंवा विषय निवडीचे स्वातंत्र्य असावे. सध्याच्या प्रवेश प्रक्रियेवर चिंतन करणे आवश्यक आहे. सध्या उद्योगातील मरगळीचा प्रवेशावर परिणाम झाला आहे. मात्र, अशी परिस्थिती जास्त काळ टिकून राहणार नाही. महेश शिवणकर, सहसंचालक, तंत्रशिक्षण

अशी आहेत कारणे

0 विद्यार्थी मोठय़ा संख्येने पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. मात्र, उद्योग क्षेत्रात तेवढय़ा जागा नाहीत.

0 महाविद्यालयांची विश्वासार्हता. सामान्यांना न परवडणारे शुल्क. पदविका झालेले विद्यार्थी थेट अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षात प्रवेश घेत आहेत.