आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती महाविद्यालयाच्या 27 प्राध्यापकांवर बेकारीची कु-हाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आमदार सतीश चव्हाण सर्वेसर्वा असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित शिवछत्रपती महाविद्यालयातील 27 प्राध्यापकांवर बेकारीची कु-हाड कोसळली आहे. कोणतेही ठोस कारण नसताना संबंधित प्राध्यापकांना गेल्या आठवड्यात काम थांबवण्याचे आदेश प्राचार्य डॉ. पी. व्ही. अष्टेकर यांनी दिले आहेत. याबद्दल त्यांनी चव्हाण यांच्याकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात अंग झोकून काम केल्यावरही पोटावर टाच आणली गेल्याने हे तरुण प्राध्यापक अस्वस्थ, संतप्त झाले आहेत.

नेट-सेट, पीएच.डी. झालेल्या तसेच विभागप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणा-या या प्राध्यापकांनी त्यांची व्यथा ‘दिव्य मराठी’कडे मांडली. त्यांनी सांगितले की, नऊ वर्षांपूर्वी आमची अस्थायी स्वरूपात 11 महिन्यांच्या करारावर नियुक्ती झाली होती. दरवर्षी या 10 ते 20 हजार रुपये मानधन देऊन कराराचे नूतनीकरण केले जात होते. आठवडाभरापूर्वी कराराची मुदत संपल्यावर नव्या वर्षातील नेमणुकीच्या मुलाखतीसाठी दरवर्षीप्रमाणे बोलावले जाईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसा निरोप आलाच नाही. म्हणून आम्ही प्राचार्यांकडे चौकशी केली असता ‘तुमचे काम थांबवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे,’ असे उत्तर मिळाले.

...तर सगळे रस्ते बंद करू !
अचानक भवितव्य अंधारात लोटले गेल्याने प्राध्यापकांना जबर धक्का बसला. कोणत्या कारणांमुळे आमचे काम थांबवण्याचा निर्णय झाला आहे, अशी विचारणा प्राचार्यांकडे केली. तेव्हा त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही. संस्थेचे सचिव अभिजित आवरगावकर यांना भेटा, असे उत्तर दिले. तेव्हा त्यांनी आवरगावकरांचीही भेट घेतली. त्यांनी तर आणखीनच धक्का दिला. तुम्ही कोणाला निवेदन देण्याच्या भानगडीत पडू नका, नाही तर तुमचे सगळे रस्ते बंद करून टाकीन, असा दमही दिल्याचे प्राध्यापकांनी सांगितले.
आ. चव्हाण म्हणाले, अस्थायी प्राध्यापक अस्थायीच असतात
प्र. : शिवछत्रपतीच्या 27 प्राध्यापकांचे प्रकरण तुम्हाला माहिती आहे का?
उ. : होय. मला हा प्रकार नुकताच कळाला आहे.
प्र. : त्यांचे काम का थांबवण्यात आले?
उ. : आतापर्यंत मी निवडणुकीच्या कारभारात होतो. त्यामुळे नेमके कारण माहिती नाही.
प्र. : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस म्हणून तुमची काय भूमिका आहे?
उ. : महाविद्यालय विनाअनुदानित तत्त्वावर आहे. अस्थायी प्राध्यापक अस्थायीच असतात. त्यांचा 11 महिन्यांचा करार आहे. त्यांनी मुदतीपेक्षा जास्त काम केले आहे. त्याला आता मी काय करू!
प्र. : पण पदवीधरचे आमदार म्हणून तुम्ही प्राध्यापकांच्या बाजूने उभे राहणार नाहीत का?
उ. : मी सोमवारी शहरात येणार आहे. तेव्हा या प्रकरणात लक्ष घालीन.
या प्राध्यापकांवर गंडांतर
नाव कार्यकाळ
प्रा. शिवाजी राऊत 9
प्र्रा. किशोर काळे 7
एस. आर मराठे 2
संजय खरात-- 9
के. एल साळवे 2
प्रा. योगिता संत 5
प्रा. एस. एन. कानिटकर 3
प्रा. अर्चना खराडे 2
प्रा. स्वप्निल कुलकर्णी 1
प्रा. आर. व्ही. मालकर 1
प्रा. अविनाश वाकोडे 1
प्रा. डॉ. भारस्वाडकर 9
प्रा. डॉ. राणू भारतिया 3
प्रा. ज्योती भंडारी 2
प्रा. रत्ना कुलकर्णी 2
प्रा. व्ही. आर. पोतदार 6
(याशिवाय 11 प्राध्यापकांनी त्यांची नावे प्रसिद्ध करण्यास नकार दिला.)

विद्यापीठाची मान्यता असेल तर विचार केला जाईल
विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक अस्थायी स्वरूपात काम करत असतील, तर त्यांचे काम थांबवण्याचा अधिकार महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला आहे. या प्राध्यापकांच्या नियुक्तीला विद्यापीठाची मान्यता असेल, तर काम थांबवता येणार नाही.
मोहंमद फय्याज, सहसंचालक, उच्च् शिक्षण विभाग