आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 283 Candidates Come In Election Battle, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२८३ उमेदवार रिंगणात, वैजापूर तालुक्यातील बड्या नेत्यांना धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - अर्ज छाननीमध्ये एकूण ३९६ अर्जांपैकी २८३ जणांचे अर्ज वैध ठरले. यामध्ये काही बड्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. येत्या दोन दिवसांत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच खरी लढत स्पष्ट होईल.

कन्नड-सोयगाव विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या २३ उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांपैकी तीन उमेदवारांचे अर्ज छाननीअंती अवैध ठरल्याने आता २० उमेदवार रिंगणात आहेत. परंतु येत्या १ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच विधानसभेच्या रिंगणातील उमेदवारांचे खरे चित्र स्पष्ट होईल.

कन्नडच्या तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी राजीव नंदकर, तहसीलदार महेश सुधळकर, एस. आर. मामीडवार, आर. एस. शेख, आदींनी अर्जाची छाननी केली. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पूनम राजपूत, तर भाजपकडून भगवान कायंदे व बन्सीधर निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, तिघांनाही पक्षाचा बी फॉर्म मिळाला नसल्याने त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. राष्ट्रवादीचे उदयसिंग राजपूत, शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव, काँग्रेसचे नामदेवराव पवार, भाजपचे डॉ. संजय गव्हाणे, मनसेचे सुभाष पाटील, रासपचे मारुती राठोड, बसपाचे केशव राठोड, बहुजन मुक्ती पार्टीचे अनिल शिरसाठ यांच्यासह अपक्ष स. इसाक, शेख पाशू यासीन, टी. पी. पाटील, अजबसिंग राजपूत, संजय वंजारे, बापू गुंजाळ, राजेंद्र गव्हाणे, शेख इद्रिस शेख इब्राहिम, अविनाश चव्हाण, कडुबा पवार, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद आदी आठ अपक्ष असे एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत.

पैठण मतदारसंघातून ५ अर्ज बाद
पैठण । विधानसभा निवडणुकीच्या अर्ज छाननीत ५ उमेदवारांचे अर्ज पक्षाचा बी फॉर्म नसल्यामुळे बाद झाले आहेत. तसेच १६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे तसेच अपक्ष मिळून ४८ उमेदवारांनी ६६ उमेदवारी अर्ज भरले होते. निवडणूक अधिकारी रवींद्र पवार यांनी उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली. या वेळी एकाच उमेदवाराने दाखल केलेले दोन उमेदवारी अर्ज तसेच इतर १६ जणांचे अर्ज अवैध ठरले, तर ५ जणांचे अर्ज बाद झाले आहेत. ४१ अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता कोणता उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतो, याकडे पैठणकरांचे लक्ष लागले आहे.

अवैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रामनाथ चोरमले, जिल्हा परिषद सदस्य विनोद तांबे, राजू राठोड, शेख बशीर शेख कडुभाई, प्रकाश चौगुले, महादेव ठोके यांचा समावेश आहे. १ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या आखाड्यात नेमके किती उमेदवार राहतात हे समोर येणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी घोडेबाजार रंगणार आहे.

गंगापुरातून चार जणांचे अर्ज बाद, ३५ अर्ज ठरले वैध
गंगापूर | गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी झालेल्या अर्ज छाननीमध्ये ३९ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून ३५ जणांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. अवैध ठरलेल्यांमध्ये कारभारी साळुबा जाधव, राशी शिखावत, बाबासाहेब विश्वनाथ थोरात (अपक्ष), सुनील अमोलकचंद पांडे या उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, फुलंब्री मतदारसंघातील चार उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. या मतदारसंघात २३ उमेदवारांनी ३२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात आज छाननीत राहुल बारकू सोनवणे, अजय शिवराम निलाखे व सय्यद शेख हे दोघे अपक्ष, तर रमेश गंगाधर दहिहंडे यांचे दोन अर्ज दाखल होते.

वैजापुरात दिग्गजांना धक्का
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या २० उमेदवारांच्या ३७ अर्जांची छाननी उपविभागीय कार्यालयात करण्यात आली. या प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा विजया निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी कलापुरे, जे. के. जाधव व मनसेचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण या मातब्बर पदाधिका-यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत पक्षाचे ए व बी फॉर्म जोडलेले नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. आता १८ उमेदवारांचे ३३ अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, सिल्लोड मतदारसंघातून पक्षाचे अधिकृत पत्र नसल्यामुळे तीन जणांचे अर्ज सोमवारी छाननीत बाद झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चुन्नीलाल कोकणी यांनी दिली. यात भाजपचे कैलास जंजाळ, बसपाचे कृष्णा आळणे, शिवाजी शिनगारे यांचा समावेश होता.