आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 जागांसाठी 296 मतदार करणार मतदान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगर नियोजन समितीच्या 30 जागांसाठी 296 मतदारांची प्रारूप यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. मेट्रो सिटीच्या धर्तीवर शहराचा विकास व्हावा यासाठी प्राधिकरणाची घोषणा झाली आहे. आता शासनाकडे पुढील प्रस्ताव केले जातील.
नियोजन समितीच्या शहरी भागातील 20 जागांसाठी 114 मतदार मतदान करतील. महानगरपालिकेतील दोन जागा कमी झाल्याने दोन मतदार कमी झाले आहेत. ग्रामीण भागातील 10 जागांसाठी 182 मतदार मतदान करणार आहे. पुढील तीन दिवसांमध्ये त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर याविषयीचा अहवाल सादर करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
अशी होईल निवडणूक : समितीत 45 सदस्य असतील. नगर विकास खात्याचे प्रधान सचिव आणि विभागीय आयुक्त या समितीचे पद्सिद्ध सदस्य असतील. यात 15 सदस्यांची नियुक्ती शासन करणार आहे. उर्वरित 30 सदस्य हे शहरी आणि ग्रामीण भागातून निवडून येणार आहेत. शहरी भागातील 20 सदस्यांची निवड महानगरपालिकेतील 97 नगरसेवक आणि खुलताबाद नगरपालिकेतील 17 नगरसेवक यांच्यातून निवडणुकीद्वारे होईल, तर ग्रामीण भागातील 10 सदस्यांची निवड जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्कलमधील सदस्य आणि प्राधिकरणात समाविष्ट होणा-या गावांची सरपंच यामधून निवडल्या जातील. या प्रक्रियेत मतदान करता यावे यासाठी दोन नामनिर्देशित सदस्यांनी नगरपालिका विभागाकडे अर्ज केला आहे. याप्रकरणी नगरपालिका सचिवांकडे अर्ज पाठवण्यात आला असून तरतुदीनुसार नामनिर्देशित सदस्यांना मतदान करता येत नाही.
310 गावांचा समावेश - महानगर प्राधिकरणामध्ये मनपा शहर, छावणी परिषद, सिडको यांच्यासह 310 गावांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील 142, पैठणमधील 43, खुलताबादमधील 39, फुलंब्री तालुक्यातील 20 आणि गंगापूरमधील 66 गावांचा समावेश आहे.