आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-पिकअप व्हॅनचा भीषण अपघात, 3 ठार, एक जखमी; जेसीबीने काढले मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिऊर- लाकडाने भरलेल्या ट्रक आणि अशोक लेल्यांड दोस्त प्लस या व्हॅनची जोरदार धडक होऊन व्हॅन मधील तीन जण जागीच ठार तर एक जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे घडली. अपघातात मरण पावलेले तिघेही औरंगाबाद जिल्ह्यातील औराळी व परिसरातील रहिवासी आहेत.

 

बाळासाहेब पवार (40, रा. धनगरवाडी), गणेश वारे (25, रा. औराळी), लहानू वाघ (35, रा.औराळा) अशी मृतांची नावे आहेत. बद्रीनाथ निकम (रा. हिंगणा) हे जखमी आहेत.

 

कन्नड तालुक्यातील औराळी व परिसरातील चौघे जण अशोक लेल्यांड वाहनातून राहाता येथून शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी डिझेल जनरेटर मशीन खरेदी करून औरळी येथे परतत होते. त्याचवेळी सिल्लोडहून लाकडे भरून कोपरगावकडे जाणाऱ्या ट्रक (एमएच-17-टी -9519) आणि अशोक लेल्यांड व्हॅन (एमएच-20-ईजी-3861) यांच्यात शिऊर येथील बस स्थानकासमोर जोरदार धडक झाली. यावेळी ट्रक जागेवर पलटी झाली. व्हॅन ट्रकला धडकुन उलटल्याने ट्रकमधील लाकडाचा ढिगारा व्हॅनवर कोसळल्याने व्हॅन दबली गेली. अपघाताचा जोरदार आवाज झाल्याने नजीक राहणारे पवन चुडीवाल, रवींद्र सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी शिऊर पोलीस, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव आणि 108 रुग्णवाहिकेला बोलावले. व्हॅन मधील चलकासह तिघे दबले होते, त्यांना बाहेर काढणे कठीण असल्याने जेसीबी यंत्र मागवण्यात आले. मदतकार्या दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा बाजूने वाहतूक ठप्प झाली होती.

 

मृतदेह बाहेर काढण्यास लागला दीड तास

जेसीबीच्या साह्याने ट्रक व व्हॅन बाजूला करण्यासाठी विखुरलेल्या लाकडांना बाजूला सारावे लागले. त्यानंतर व्हॅन मधील दबलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तास लागला. त्यानंतर अखेर रात्री बारा वाजता तिघांचे मृतदेह जेसीबीने दरवाजे तोडून बाहेर काढण्यात यश आले. तिघेही जागेवरच गतप्राण झालेले असल्याने औराळी येथुन आलेल्या नातलगांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तर जखमी तरुणाला औरंगाबाद येथे हलवण्यात आले. याकामी सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, पत्रकार संजय पगारे, गणेश सोनवणे, टिल्लू सोनवणे, मंगेश जाधव, जेसीबी चालक रामा भोसले, शिरीष चव्हाण,
स.पो.नि. धनंजय फराटे, रोहिदास तांदळे पोलीस कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी मदतकार्य केले.


खड्डे बुजवले अन वाहनांचा वेग वाढला

शिऊर बंगला ते वैजापूर दरम्यान, खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. खड्डे बुजवताच वाहनांचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे. आधीच हा मार्ग अरुंद असून रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कपार खोलगट आहेत. वाहन ओव्हरटेक करताना चालकाचे अनेकदा नियंत्रण सुटते आणि परिणामी अपघात घडतात. त्यामुळे औरंगाबाद ते वैजापूर रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे झाले आहे. अपघात घडला त्या ठिकाणी दिवसभर विद्यार्थ्यांसह, प्रवाशांची गर्दी असते. हा अपघात रात्री घडल्याने मोठा अनर्थ टळला.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अपघाताची ‍भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...