आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा लेणी रस्त्यावर ३० कोटींची मलमपट्टी, डिसेंबरपासून खड्डे बुजवण्यास प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद ते अजिंठा लेणीपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम डिसेंबरपासून हाती घेण्यात येत असून अद्ययावत तंत्रज्ञानाने ते बुजवले जातील असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ३० कोटी रुपयांच्या या कामाच्या शुभारंभासाठी ते पुढील आठवड्यात पुन्हा औरंगाबादेत येत आहेत. या मार्गावरील खड्डे बुजवले गेल्यास लेणी पाहण्यासाठी जाणाऱ्यांचा प्रवास सुकर होईल. दरम्यान, औरंगाबाद जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामही येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होत असून ही खड्डे दुरुस्ती म्हणजे चौपदरी रस्ता तयार होईपर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरती सुविधा असेल.

या रस्त्याबरोबरच मराठवाड्यातील वेगवेगळ्या ८० कामांचाही श्रीगणेशा याच दरम्यान होणार आहे. कनिष्ठ अभियंत्यांच्या राज्य अधिवेशनाच्या उद््घाटनासाठी पाटील शनिवारी (२८ नोव्हेंबर) औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. अजिंठा लेणीपर्यंतच्या ९० किलोमीटर रस्त्यापैकी ५० किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. विदेशी पर्यटक येथे भेट देण्यासाठी जातात. त्यामुळे हा रस्ता चांगला असावा, अशी अनेक महिन्यांपासूनची मागणी आहे. त्यातच हा रस्ता चौपदरी करण्याचे ठरवण्यात आल्याने खड्डेही बुजवण्यात येत नाहीत. चौपदरी रस्त्याचे काम होईल तेव्हा होईल, तोपर्यंत रस्ता चांगला असावा म्हणून खड्डे बुजवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पाटील यांनी सांगितले. हे रस्ते अद्ययावत पद्धतीने म्हणजे चौकोनाकृती खोल खोदून बुजवले जातील. त्यानंतर त्यावर डांबराचा थर चढवला जाईल. त्यामुळे हे खड्डे अनेक वर्षे उखडणार नाहीत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
बांधकाम विभागाच्या वतीने मराठवाड्यासह राज्यात एक हजार कामे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू केली जाणार आहेत. कामाचा दर्जा चांगला राहील, याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यायची असून त्यांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आचार संहितेमुळे विलंब
हेकाम ३१ ऑक्टोबरलाच सुरू करायचे होते; परंतु तेव्हा राज्यात महापालिका तसेच दीड हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. आचारसंहितेमुळे हे काम सुरू होण्यास विलंब झाल्याचे पाटील यांनी सांगितले. पूर्वी मंत्री आले म्हणजे उद्घाटन केले जायचे अन् प्रत्यक्षात काम सुरू होण्यास विलंब लागायचा; परंतु आता कोणत्याही परिस्थितीत कार्यादेश निघाल्याशिवाय कोणत्याही कामाचे उद्घाटन केले जाणार नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. अजिंठा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाचा आदेश अजून प्राप्त झाला नाही. त्यामुळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

ही तर मलमपट्टी
शुक्रवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २५ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले. तर बांधकाममंत्री पाटील यांनी ३० कोटी खर्चून खड्डे बुजवण्याची मोहीम घेणार असल्याचे सांगितले. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले जात असतानाच शासनाने चार किंवा सहा पदरी रस्त्याच्या कामाला त्यांनी गती द्यायला हवी, असा मतप्रवाह पुढे येत आहे. त्यामुळे खड्डे दुरुस्ती ही तात्पुरती मलमपट्टी ठरणार आहे.