आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३० लाखांचे मोबाइल जप्त, जळगावच्या कारचालकाविरुद्ध वडोदबाजार येथे गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादहून जळगावकडे जाणारे ३० लाख ९४ हजार रुपये किमतीचे १३८० मोबाइल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जप्त केले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास वडोदबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

एमएच १९ बीएम ११७७ क्रमांकाची ओम्नी व्हॅन पोलिसांनी फरशी फाट्याजवळ थांबवली. त्यात २० बॉक्समध्ये मोबाइल होते. मायक्रोमॅक्स कंपनीच्या या मोबाइलची किंमत ३० लाख ९४ हजार रुपये असल्याचे किमतींवरून दिसून येत होते. कारचालक विनोद पाटील (रा. जळगाव) याच्याकडे विचारणा केली असता तो कागदपत्रे सादर करू शकला नसल्याने सर्व मोबाइल तसेच मोटार जप्त करण्यात आल्याचे फुलंब्रीचे तहसीलदार किशोर देशमुख यांनी सांगितले.
आयोगाच्या नियमानुसार ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम तसेच १० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे गिफ्ट सोबत असेल तर त्याबाबतची कागदपत्रे द्यावी लागतात; अन्यथा वरील दोन्हीही गोष्टी मतदारांना आमिष देण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे गृहीत धरून ते जप्त केले जातात. मोबाइल हा प्रकार गिफ्ट अर्थात भेटवस्तू या प्रकारात मोडतो. हे मोबाइल जर विक्री करण्यासाठी नेण्यात येत असतील तर संबंधिताने त्याबाबतची कागदपत्रे सादर करणे अपेक्षित होते. मात्र विनोद पाटील कागदपत्रे सादर करू शकला नाही. त्यामुळे मतदारांना आमिष दाखवण्यासाठीच ही कागदपत्रे नेण्यात येत असल्याचे गृहीत धरून कारवाई करण्यात आली.