आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 300 Houses Water Supply Shut Down At Satara Tanda

सातारा तांड्यावरील ३०० घरांचे पाणी बंद, प्रशासनाचे दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा तांड्यावरील पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटारीत बिघाड झाला असून त्याची प्रशासनाकडून दखल घेतल्यामुळे पाच दिवसांपासून ३०० घरांतील कुटुंबीयांना भटकंती करावी लागत आहे.
चार दिवसांपूर्वी मनपातर्फे सातारा-देवळाई भागाचा कारभार जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला.
प्रशासकीय वादामध्ये मात्र गेल्या दीड वर्षामध्ये रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तांड्यावर ३०० ते ४०० घरांची लोकवस्ती आहे. या परिसरातील एका विहिरीमधून जलवाहिनीद्वारे तांड्यावर पाणीपुरवठा करण्यात येतो. मध्यंतरी या ठिकाणी असलेला तलाव नाल्याचे खोलीकरण तसेच रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे विहिरीमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. विहीर तांड्यामध्ये जवळपास एक किलोमीटरचे अंतर असून पाणी जलवाहिनीद्वारे पुरवले जाते; परंतु मोटारीचा स्टार्टर भाग बिघडल्याने पाणीपुरवठा बंद झाला असल्याचे पाणीपुरवठ्याचे किरण नरवडे यांनी सांगितले. विहिरीद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद आहे. प्रशासनातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. मोटार बंद आहे तर किमान टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी गब्बू राठोड, सोमीनाथ शिराणे यांच्यासह अन्य गावकऱ्यांनी केली आहे.