आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोम्बिंग ऑपरेशनमध्‍ये 34 गुन्हेगारांची धरपकड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - फरार आणि सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 34 गुन्हेगार जाळ्यात सापडल्याची माहिती पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी गुरुवारी दिली.

नव्वद टक्के आरोपी पकडून त्यांच्यावर कारवाई केल्यास उर्वरित आरोपींची हिंमत खचते. त्यासाठी फरार आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सहा पोलिस ठाण्यांमध्ये बुधवारी मध्यरात्री विविध भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. मंगळसूत्र पळवणे, चोर्‍या, तोतया पोलिस आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे.

शहरात भाड्याने खोली घेऊन चोरटे राहत असल्याचा संशय पोलिसांना आहे. घरमालकांनी भाडेकरूची माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहन केले आहे. माहिती न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. याचाच एक भाग म्हणून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येत आहे. सातारा, छावणी, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मंगळसूत्र चोरीच्या घटना घडत असल्याची चिंता पोलिस आयुक्तांनी व्यक्त केली.

न्यायालयाने बजावलेले समन्स देण्यासाठी दिवसा पोलिस जातात. मात्र, त्यांना आरोपी घरात सापडत नाहीत. त्याचप्रमाणे रेकॉर्डवरील आरोपीदेखील दिवसा गायब असतात. त्यांना रात्री पकडणे शक्य असल्याने ते राहत असलेल्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केले जाते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी मुकुंदवाडी आणि सिडको पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले होते.


वाळूज एमआयडीसी व वाळूज : पोलिस निरीक्षक किशोर नवले आणि बालाजी सोनटक्के यांच्यासह 30 सहकार्‍यांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आठ जणांना अटक केली.

जिन्सी ठाणे : पोलिस निरीक्षक गफूर पाटील आणि सहकार्‍यांनी केलेल्या कारवाईत रेकॉर्डवरील दुचाकी चोर आणि न्यायालयीन वॉरंट असलेले असे 9 जण ताब्यात घेतले.

सिडको पोलिस ठाणे : पोलिस निरीक्षक प्रताप बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा आणि वॉरंट बजावण्यात आले.

सातारा पोलिस ठाणे : या पोलिस ठाण्याअंतर्गत पहिल्यांदा कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. सिल्कमिल कॉलनी, सादातनगर, राहुलनगर, विटखेडा अशा ठिकाणी निरीक्षक बाबूराव कंजे आणि त्यांच्या 15 सहकार्‍यांनी छापे मारून तीन गुन्हेगारांना पकडण्यात आले. यामध्ये बाबासाहेब ऊर्फ पपडी भीमराव शिंदे हा हद्दपार गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला.

उस्मानपुरा पोलिस ठाणे : निरीक्षक भारत काकडे आणि त्यांच्या तीन पथकाने कबीरनगर, नागसेननगर, मुरलीधरनगर आणि झोपडपट्टी परिसरात छापे मारले. रेकॉर्डवरील आठ गुन्हेगार ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.