आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओपन स्पेसवर बांधले 35 फ्लॅट, एकाच फ्लॅटची दोघांना विक्री, बिल्डर, ग्रामसेवक, सरपंचाची मिलीभगत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- झाल्टा परिसरातील सुंदरवाडी भागात आधी एका जमीन मालकाने ग्रामपंचायतीकडून नियमबाह्य रेखांकन तयार करून घेतले. तेच रेखांकन रिव्हाइज करून घेत आधी दाखवलेल्या खुल्या जागेत प्लॉट दाखवण्याची करामत केली. नंतर या जागेवर त्याने ३५ फ्लॅट बांधले. एकतर खुली जागा हडपली आणि त्यावर इमारत उभी केली. याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यावर या बिल्डरने या ३५ फ्लॅटच्या इमारतीतील काही फ्लॅट दोघांना विकण्याची करामत केल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. 

शहरालगतच्या २८ गावांकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र प्राधिकरण अधिनियम १९६६ च्या तरतुदींनुसार सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार या २८ गावांमध्ये कुठल्याही स्वरूपाचे विकासकार्य करण्यासाठी सिडको कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ही परवानगी घेण्यापूर्वी महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम ४४ नुसार जमिनीचा अकृषक वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीही अनिवार्य आहे. त्यानंतर संबंधित जागेची रेखांकन मंजुरी घेणेही तेवढेच महत्त्वाचे बंधनकारक आहे. त्यानंतरच रेखांकनानुसार विशेष नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी मिळते. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते. त्याशिवाय या २८ गावांमध्ये कोणतेही विकासकाम करता येत नाही. असे असताना ग्रामपंचायतीने अनधिकृत रेखांकन बांधकाम परवाने दिले आहेत. पुढे आपणच दिलेल्या रेखांकन मंजुरीनंतर त्यात बदल करून दिले. यातून खुले भूखंड हडप करण्यास बिल्डरांना मदत केली आहे. 

मुळात घुंगेंकडून वैधता प्रमाणपत्रच मिळाले नसते तर बिल्डर एवढा पुढे गेलाच नसता. सारे काही गोलमाल चालत असल्याचे पाहून त्याची हिंमत आणखी वाढली आणि त्याने नुसतेच अवैध बांधकाम केले नाही तर त्याहीपुढे जात काही फ्लॅट दोघांना विकले. त्यामुळे पै-पै जमवून घर घेणाऱ्या सर्वसामान्यांची किती घोर फसवणूक होते याचा विचारच बोगस काम करणारे अधिकारी करत नाहीत, हेच यातून स्पष्ट होते. 

प्रमाणपत्रच मिळाले नसते तर... 
अधिकार नसताना तत्कालीन ग्रामसेवक बी. ए. हालगडे बी. टी. साळवे यांनी ग्रामपंचायतीचा बोगस ठराव देऊन सुंदरवाडीतील रेखांकनाला परवानगी दिली होती. सुरुवातीला जागेचे मालक विनायक बडे आणि भाऊसाहेब थोरात यांनी प्लॉट क्रमांक ६४ ते ६७ हे भूखंड मधुकर मोरे भागीरथी घुगे या पोलिस अधिकाऱ्यांना विकले. त्यांनी ते गणेश मेहता यांना विकले. मेहतांकडून हा प्लॉट डेव्हलप करण्यासाठी प्रथमेश कन्स्ट्रक्शनचे बिल्डर प्रफुल्य मांडे यांनी घेतला. या ओपनस्पेसवर बांधकाम परवानगी देणाऱ्या रेखांकनास तिसरे ग्रामसेवक के. एस. घुगे यांनी डोळे झाकून वैधता प्रमाणपत्र दिले. त्या आधावरच या खुल्या जागेवर बिल्डरने ३५ फ्लॅटची भव्य इमारत उभी करून विकली. एवढेच नव्हे, तर यातील काही फ्लॅट दोघांना विकण्याचा प्रतापही बिल्डरने केल्याचे उघडकीस आले आहे. मांडेंविरुद्ध सिटी चौक, क्रांती चौक सातारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

काय आहे घाेटाळा? 
सुंदरवाडीतीलगट क्रमांक ३१ मधील प्लॉट क्रमांक ६४, ६५, ६६, ६७ हे प्रथमेश कन्स्ट्रक्शनचे बिल्डर प्रफुल्य मांडे यांनी चक्क ३५ फ्लॅट बांधून विकले. हे भूखंड त्या रेखांकनामधील ओपनस्पेस असल्याचा पर्दाफाश डीबी स्टारने १३ एप्रिल २०१७ रोजी केला होता. यानंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळंुके यांनी बीडीओमार्फत चौकशी करून अहवाल मागवला होता. यात अधिकार नसताना पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक बी. ए. हालगडे बी. टी. साळवे यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

क्लिअर टायटल आहे 
आम्ही नक्की चहा प्लॉट पोलिस अधिकाऱ्यांकडून घेतला आहे. तो घेताना सर्व कागदपत्रे तपासली आहेत. मांडेंना आम्ही तो डेव्हलप करायला दिला. त्यानंतर त्यांनी फ्रॉड केला असेल तर त्यात आमचा दोष नाही.
- गणेश मेहता, मूळजमीन मालक
 
ठराव बघून परवानगी 
आधीच्या ग्रामसेवकांनी रेखांकनाला ठराव घेऊन परवानगी दिली होती. त्या ठरावाच्या आधारे मी बांधकाम परवानगी म्हणजेच वैधता प्रमाणपत्र दिले आहे. नियमानुसार जे आधीच्यांनी केले, तेच मी केले.
- के.एस. घुगे, ग्रामसेवक,सुंदरवाडी 
बातम्या आणखी आहेत...