आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेला सापडले तापाचे ३७ रुग्ण, घाटीत स्वाइन फ्लूचा संशयित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
औरंगाबाद - वॉर्ड ईमध्ये येणाऱ्या मुकुंदवाडी, चिकलठाणा, अंबिकानगरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. १२ हजार घरांचे सर्वेक्षण केल्यानंतर तापाचे ३७ रुग्ण आढळल्याचे मनपाचे म्हणणे आहे.
मुकुंदवाडी, चिकलठाणा, अंबिकानगरात मागील दोन आठवड्यांपासून डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून रुग्णांची संख्या वाढत आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने एक पत्रक काढून हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मनपाच्या २० पथकांच्या मदतीने ३० जुलैला चिकलठाण्यात, ३१ तारखेला मुकुंदवाडीत, तर ऑगस्टला अंबिकानगरात मोहीम राबवण्यात आली. त्यात १२ हजार १४६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले १९ हजार ५७७ कंटेनर्सची तपासणी करण्यात आली. त्यातील डासअळ्या असणारे २१४ कंटेनर रिकामे करण्यात आले, तर १७ हजार ८१ कंटेनर्समध्ये अॅबेट टाकण्यात आले. याशिवाय तापाचे ३७ रुग्ण आढळले असून २६ रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी दिली.

पत्रके कुठे गेली?
यामोहिमेत आपण काय केले याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. घरोघरी डेंग्यू प्रतिबंधक उपायांची माहिती देणारी पत्रके वाटल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. मुकुंदवाडी भागातील नागरिकांशी संपर्क साधला असता गेल्या आठवडाभरात अशी पत्रके वाटली गेली नसल्याचे म्हटले आहे.

घाटीत स्वाइन फ्लूचा संशयित
घाटीरुग्णालयात शहरातील एक स्वाइन फ्लू संशयित रुग्ण दाखल झाला आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या लाळेचा नमुना एनआयव्हीला पाठवण्यात आला असल्याचे डॉ. जी. एन. गायकवाड यांनी सांगितले. श्वसनसंस्थेतील विकारांचे प्रमाण सध्या वाढलेले आहे. अहवाल आम्ही पाठवला आहे, अजून निकाल आलेला नाही. मात्र, नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. वातावरणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वैयक्तिक काळजी घ्यावी, असे आवाहनही डॉ. गायकवाड यांनी केले. दरम्यान घाटीमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराचे दोन रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी रमानगरमधील रुग्ण मंगळवारी रात्री खासगी इस्पितळात दाखल होण्यासाठी निघून गेला, तर लहान मुलांवर बालरोग विभागात उपचार सुरू आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
बातम्या आणखी आहेत...