आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकी पेशात केवळ ४.०४ टक्के मुलांना येण्याची इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोणत्याही देशातील अधिकारी, डॉक्टर, अभियंते घडण्याची प्रक्रिया शाळांमध्येच सुरू होते. अनेकांना शिक्षकांकडून मिळणारी प्रेरणा उच्च पदावर पोहोचवत असते. त्यामुळे शिक्षक हाच देशाचा खऱ्या अर्थाने पाया आहे, असे म्हटले जाते. शिक्षकी पेशा हेदेखील एक करिअर आहे. मात्र, शालेय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्यांपैकी केवळ ४.०४ टक्केच मुलांना शिक्षक होण्याची इच्छा आहे. ‘दिव्य मराठी’’ने शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या प्रातिनिधिक सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. शिक्षक होणे त्रासदायक आहे. शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी संस्थाचालकांना खूप पैसे द्यावे लागतात. शिकवण्यापेक्षा इतरच कामे करावी लागतात. समाजात फारशी प्रतिष्ठाही नसते, अशी कारणेही या मुलांनी सांगितली.
घर आणि कुटुंबानंतर विद्यार्थिदशेतील सर्वात महत्त्वाची व्यक्त्ती म्हणजे शिक्षक. मुलांना करिअरसाठी तर हे सर्वात सुरक्षित क्षेत्र. यामुळेच आजच्या तरुण पिढीला शिक्षक म्हणून करिअर संधीविषयी काय वाटते. हे जाणून घेण्यासाठी ‘‘दिव्य मराठी’’ने खास सर्वेक्षण केले. तेव्हा ९६ टक्के मुलांनी जिल्हाधिकारी, डॉक्टर, अभियंता, लष्करी अधिकारी व्हायचे आहे, असे स्पष्ट केले.
यासाठी नाही व्हायचे
>डीएड, बीएडधारकांची संख्या खूप, पण नोकरीच्या संधी कमी
>शिक्षक होण्यासाठी पैसे द्यावे लागतात.
>नोकरी मिळाली तर ती वेतनाविना चाकरी
>शिक्षकांना अभ्यास घेण्यासोबत इतरही कामांचा ताण
यासाठी व्हायचे शिक्षक
>मुलांवर संस्कार व्हावेत.
>समाजातील वाईट प्रवृत्ती दूर कराव्यात.
>साक्षर, बलशाली निरोगी समाज, देश घडवावा.
>समाजात आदराचे स्थान मिळावे.
>शाळांतील सर्व कार्यक्रमांत शिक्षकांना महत्त्व मिळते.
>शिक्षकांना खूप सुट्या मिळतात. इतर नोकरीत मिळत नाहीत.
असे केले सर्वेक्षण
१.टीम ‘दिव्य मराठी’ने सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शाळेतील इयत्ता दहावीच्या चार (दोन मुलांच्या, दोन मुलींच्या) तुकड्या निवडल्या.
२. या तुकड्यांच्या वर्गात जाऊन त्यांना तुमच्यापैकी किती जणांनी करिअरबद्दल विचार केला, असे विचारले.
३. कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, अशी विचारणा केली.
४. तुमच्यापैकी किती जणांनी शिक्षक होण्याचे ठरवले आहे, त्यांनी हात उंचावावा, असे आवाहन केले. त्यावर मिळालेल्या प्रतिसादाची नोंदणी केली.
निष्कर्ष : चार तुकड्यांतील २४७ पैकी अवघ्या १० म्हणजे केवळ ४.०४ % मुलांनी शिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली. ई-तुकडीतील ६० पैकी एकाही मुलाने शिक्षक होण्यात रस नाही दाखवला.
संघर्ष वाढलाय.डीएड, टीईटीनंतर नोकरी मिळवण्यासाठीही दमछाक होते. यानंतरही वेतनाची हमी नाही. हे चित्र अनेक संस्थांमध्ये आहे. यामुळे आजच्या पिढीला शिक्षक होण्याची इच्छा नसावी. - सुरेखादेव-शास्त्री, मुख्याध्यापिका, शारदा मंदिर प्रशाला
शिक्षक होण्यास आवडेल, पण...
आमच्या मराठीच्या बाईंना बघून मलाही शिक्षिका होण्यास आवडेल. परंतु आज वर्तमानपत्रांत येणाऱ्या शिक्षकांच्या समस्या, डीएड, बीएड करूनही नोकरीची संधी नाही, यामुळे शिक्षक होणेच बरे, असे वाटते. - श्रुती बेंजरगे, विद्यार्थिनी
(हा विषय मौलाना आझाद महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या प्रा. डॉ. अपर्णा भोंडे यांनी सुचवला आहे.)
बातम्या आणखी आहेत...