आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉर्निंग डेथ: पाय तुटला तरीही 15 मीटर चालत जाऊन लहुजींनी जवळच्या रहिवाशांना उठवले, चिकलठाणा सुन्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालना रोड, बीड बायपास आणि दौलताबाद रोडवर वाहनांच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या दोन-चार घटना दरमहिन्याला हमखास घडतात. परंतु धडक देणारे ते वाहन पाहणारे कुणीच नसल्याने अशा घटनांची नोंद ‘अज्ञात वाहना’च्या धडकेने मृत्यू अशीच होते. शनिवारी भल्या पहाटे जालना रोडवर हॉटेल विजयराज आणि हॉटेल काळे बंधूच्या दरम्यान स्कॉर्पिओने मॉर्निंग वॉक करणाऱ्या सहा जणांना उडवले. धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओ रस्त्याच्या बाजूला चिखल असलेल्या खड्ड्यात रुतून बसली आणि दोघे बचावल्याने हा अपघात ‘ज्ञात वाहना’ची धडक ठरला. 

या अपघातात पाय तुटून गंभीर जखमी झालेल्या लहुजी बकाल यांनी तशाच अवस्थेत १५ मीटर चालत जाऊन सीताई रोपवाटिकेशेजारी असलेल्या कानडे कुटुंबाच्या घराचे दार ठोठावले आणि ‘आम्हाला गाडीने उडवले आहे, पटकन चालता का?’ असे थरथरत्या आवाजात त्यांनी सांगताच कानडे त्यांच्या शेजारी राहणारे नवपुते कुटुंब लगेच मदतीला धावले. लहुजी कानडे कुटुंबाला मदत मागायला जाईपर्यंत चालक स्कॉर्पिओमध्येच होता. स्कॉर्पिओ काढण्याच्या तो प्रयत्नात होता. परंतु लहुजींसोबत काही नागरिक येत असल्याचे पाहून चालकाने स्कॉर्पिओ जागीच सोडून पोबारा केला. त्याने लाल रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पँट घातली होती. 

शनिवारी पहाटे सव्वापाच ते साडेपाचदरम्यान जालना रोडवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या सहा मित्रांना जालन्याच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओने उडवले. सीताई रोपवाटिकेपासून काही अंतरावर हा अपघात घडला. या अपघातात लहुजी बकाल यांचा पाय तुटला. पण त्याही अवस्थेत हिमत करून ते उभे राहिले. त्यांना रोपवाटिकेशेजारी घर दिसले. गंभीर जखमी अवस्थेत लहुजी १५ मीटर चालत गेले. रोपवाटिकेशेजारी कानडे आणि नवपुते कुटुंबाची घरे आहेत. लहुजी यांनी कानडे यांच्या घराचे दार ठोठावले. त्यांच्या आवाजाने बाजूचे नवपुते कुटुंबही जागे झाले. गणेश कानडे, सुनील नवपुते, काबुशेठ नवपुते आणि अण्णाभाऊ नवपुते असे सात ते आठ जण तत्काळ मदतीला धावले आणि त्यांनी रस्त्याच्या बाजू्च्या खड्ड्यात पडलेले तिघांचे मृतदेह बाहेर काढले. शहरालगतच्या हायवेवर दर आठवड्यात किमान दोघांचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू होतात. दीड महिन्यापूर्वी बीडकीनजवळ झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला होता. या प्रकरणातील आरोपी गजाआड व्हावे म्हणून या तरुणाच्या आईने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिनाभर उपोषण केले होते. 
 
दीड वर्षापासून मॉर्निंग वॉक आणि गप्पा हा नित्यक्रम 
नारायणवाघमारे, भागीनाथ गवळी, अनिल सोनवणे, दगडुबा ढवळे, लहुजी बकाल, विजू करवंदे हे मागील दीड वर्षापासून नित्यनेमाने मॉर्निंग वाॅकला जात होते. केंब्रिज चौकापर्यंत गप्पा मारत गेल्यावर तेथे असलेल्या मोकळ्या पटांगणावर कसरती करून पुन्हा घराकडे निघत. रोज पहाटे सोबत जाणाऱ्या मित्रांचा हा गट परिसरात सर्वश्रुत होता. शनिवारी पहाटेच्या अपघाताने या मित्रांची कायमची ताटातूट केली. 
 
हेडलाइटच्या डाव्या बाजूने दोघांना उडवले 
वाघमारे,गवळी, सोनवणे ढवळे यांच्यापैकी दोघांना स्कॉर्पिओच्या हेडलाइटच्या डाव्या बाजूने उडवले तर दोघांना डाव्या बाजूने जोरात धक्का बसला. यात बकाल यांनाही गाडीने उडवल्याने ते खड्ड्याच्या पलीकडे जाऊन कोसळले. करवंदे हे मागे असल्याने गंभीर जखमी झाले. परंतु त्यांच्यासमोरील चौघेही धडकेने रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. 
 
महामार्गांवर पहाटे किंवा रात्री उशिरा घडतात असे अपघात 
शहरालगतच्याहायवेवर दर आठवड्यात किमान दोघांचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यु होत असल्याचे वृत्त येते. मुंबई, दौलताबाद, बीड बायपास, जालनारोड पुण्याकडे जाणाऱ्या या मार्गावर पहाटे किंवा रात्री उशिरा असा प्रकार होतो. या घटनेत स्कॉर्पिओ खड्ड्यात अडकली म्हणून चालकावर कलम ३०४ ३०८ नुसार गुन्हा तरी दाखल केला, असे सहाय्यक आयुक्त नागनाथ कोडे यांनी सांगितले. 

गणेश कानडे सांगतात.. 
आम्हाला गाडीने उडवले, पटकन चालता का? असे लहुजी म्हणाले आणि आम्ही धावलो 
साधारणसहा वाजेपर्यंत आमचे कुटुंब जागे झालेले असते. शनिवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास अचानक कुणीतरी दार ठोठावले. इतक्या पहाटे कोण असावे, असा प्रश्न मला पडला. मी दार उघडले. पाहतो तर समोर चिकलठाण्यात राहणारे ओळखीचेच लहुजी होते. तुटलेला पाय आणि रक्तबंबाळ अवस्थेत ‘आम्हाला गाडीने उडवले, पटकन चालता का?’ असे लहुजी मला म्हणाले. त्यांना नीट उभेही राहता येत नव्हते. तोपर्यंत आवाजाने आजूबाजूच्या लोकांनाही जाग आली होती. आम्ही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा स्कॉर्पिओ चिखलात रुतलेली होती. पाण्यात चौघे रक्तबंबाळ पडलेले होते. त्यातील एक जण गाडीच्या खाली होता. पोलिस आणि रुग्णवाहिकेला बोलावणे आवश्यक होते. आमच्यापैकी सात-आठ जण अपघातग्रस्तांना मदत करण्यात गुंतले. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू ठेवूनच मी साडेपाच वाजेच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्ष एमआयडीसी पोलिसांना पहिला कॉल केला आणि अपघाताची माहिती दिली. तोपर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढले होते. परंतु एकाचा मृतदेह खोल पाण्यात गेल्याने गळाने तो बाहेर काढला. पोलिसांनी कंटेनर लावून स्कॉर्पिओ बाहेर काढली. घटनास्थळाचे दृश्य हेलावणारे होते. 
 
बातम्या आणखी आहेत...