आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिकांना मेजवानी: ४ दिग्दर्शकांनी तयार केलेला ‘बायोस्कोप’ जुलैमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बायोस्कोप चित्रपटाचे ४ दिग्दर्शक. गजेंद्र अहिरे, रवी जाधव, विजू माने आणि गिरीश मोहिते. - Divya Marathi
बायोस्कोप चित्रपटाचे ४ दिग्दर्शक. गजेंद्र अहिरे, रवी जाधव, विजू माने आणि गिरीश मोहिते.
औरंगाबाद - कसदार मराठी साहित्यातील एकेका कथा, कादंबरीवर दर्जेदार चित्रपटांची निर्मितीची परंपरा असणाऱ्या मराठीत आता चार कवितांवर आधारित चार दिग्दर्शकांनी तयार केलेल्या चार चित्रपटांचा बायोस्कोप नावाचा चित्रगोफ पुढील महिन्यात १७ जुलैला प्रदर्शित होत आहे. औरंगाबादकर मंगेश देसाईची यातील एका चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. फक्त कवितांवर आधारित असलेल्या या चित्रपटाला विख्यात कवी गुलजार यांची काव्यात्म प्रस्तावना हेही त्याचे आकर्षण असेल.

चार दिग्दर्शक, चार कवितांवरील वेगवेगळ्या चार गोष्टी, चार कवी, चार संगीतकार अशा चौकोनी भिंगाच्या चौकटीतून सादर होणारा ‘बायोस्कोप’ १७ जुलै रोजी संपूर्ण राज्यात प्रदर्शित होत आहे. ठाण्याच्या आर्ट गिल्डमधील कलावंतांनी एकत्र येत या अभिनव चित्रपटाची निर्मिती केली असून अभय शेवडे यांच्या ‘गोल्डन ट्री एंटरटेंन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेने निर्मिती केली आहे.
मूळचा औरंगाबादचा अभिनेता मंगेश देसाई याची या चारपैकी बैल नावाच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. मंगेशने सांगितले की, कथा व कादंबरीवरील चित्रपट तसे सोपे असतात. पण कविता निवडून त्यातील एकसमान धागा शोधून तो आशय ठसठशीत सांगणारे चार चित्रपट तयार करणे व त्यांची योग्य गुंफण करणे अवघडच काम होते. हा चित्रपट माझ्या कारकीर्दीतील अतिशय वेगळ्या धाटणीचा अाहे. मराठवाड्यात या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार आहें.

दिग्गज दिग्दर्शक : टाइमपास, बालक-पालक, बालगंधर्व, नटरंग यासारख्या एकापेक्षा एक हिट देणारे दिग्दर्शक रवी जाधव तसेच पिपाणी, टुरिंग टॉकीज, पोस्टकार्ड, अनवट, अनुमती यासारख्या सिनेमांचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा, भारतीय, तुला शिकवीन चांगला धडा, बे दुणे चार अशा चित्रपटांद्वारे घराघरात पोहोचलेले तसेच सध्या सुरू असलेल्या ‘येक नंबर’चे दिग्दर्शक गिरीश मोहिते; तर खेळ मांडला, गोजिरी, ती रात्र, शर्यत अशा चित्रपटांचे दिग्दर्शक विजू माने या चारही दिग्गजांनी एकत्र येऊन एकाच चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

भावनिक कैफियतीचा धागा
चार वेगवेगळ्या कवींच्या कविता निवडून त्यांच्या चार कथांचा ‘बायोस्कोप’ येथे साकारण्यात आला आहे. यात मिर्झा गालिब यांच्या गझलवर गजेंद्र अहिरे यांनी ‘दिल-ए-नादान’ हा लघुपट, तर संदीप खरेच्या कवितेवर रवी जाधव यांनी ‘मित्रा’ हा लघुपट साकारला आहे. या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच सौमित्र यांच्या कवितेवर ‘एक होता काऊ’ हा लघुपट विजू माने यांनी दिग्दर्शित केला आहे. हा लघुपट व मित्रा या दोन्ही लघुपटांची प्रतिष्ठेच्या ‘इंडियन पॅनारोमा २०१४’ मध्ये निवड झाली होती. विदर्भातील प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या कवितेवर गिरीश मोहिते यांनी ‘बैल’ नावाचा लघुपट बनविला आहे. कविता आणि त्यातून व्यक्त होणारी भावनिक कैफियत हा समान धागा धरून हे चौघे दिग्दर्शक या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...