आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: चार लाख रुपये बुडवण्याच्या नादात 8 लाख भरण्याची वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : मित्राकडून हात उसने घेतलेले चार लाख रुपये परत देण्याऐवजी मी तुला ओळखत नाही असे म्हणत मित्राचे पैसे गडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला वकिलाने चांगलीच अद्दल घडवली. पैसे घेऊन स्पष्ट नकार देणाऱ्या आरोपीचा आणि पैसे देणाऱ्या मित्राचा चौथ्या वर्गातील फोटोच न्यायालयात सादर करून आरोपी मित्राला उघडे पाडले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शलाका जांभले यांनी १२ जून रोजी आरोपीला तीन महिने सक्तमजुरीसह धनादेशाच्या रकमेएवढाच दंड ठोठावला. 
 
सिडको एन-६ येथील बांधकाम व्यावसायिक किशोर उबाळे यांनी त्यांचे बालपणाचे मित्र मनोज प्रकाश भाले यांना ११ सप्टेंबर २०१४ रोजी ४ लाख रुपये उसने दिले होते. त्यापोटी तेवढ्या रकमेचा धनादेश मनोज यांनी किशोरला दिला होता. मात्र पैसे परत देण्याची वेळ आली तेव्हा मनोजने हात वर केले. अनेकदा विनवणी करूनही त्याने पैसे देण्यास नकार दिला. शेवटी किशोरने त्याच्याकडे असलेला धनादेश बँकेत टाकला आणि तो बाउन्स झाला. त्यानंतर किशाेर यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयातही मनोजने बालपणीची मैत्री नाकारली. मी गुरुदत्त नावाच्या व्यक्तीकडून ४० हजार रुपये घेतले होते. त्याच्या पोटी दिलेला धनादेश किशोरने मिळवला त्याचा गैरवापर केला, असे मनोजने न्यायालयाने सांगितले. मी गुरुदत्तला व्याजासह ४९ हजार ६०० रुपये परत केल्याचेही त्याने सांगितले. 
 
चौथीतल्या फोटाने केली पोलखोल 
साक्षी-पुराव्या दरम्यान फिर्यादीच्या वकिलाने मनोजला तुम्ही दोघे शाळेत असल्याचा फोटो मिळेल काय, असे विचाले. चौथ्या वर्गात शिकत असताना त्यांच्या एका मित्राच्या वाढदिवस सोहळ्याच्या फोटोत फिर्यादी किशोर आणि आरोपी मनोज देाघेही होते. वकिलाने या फोटोचा आधार घेऊन युक्तिवाद केला. त्यानंतर आरोपी मित्राने मैत्री मान्य केली. मनोज एका कंपनीत कार्यरत आहे. त्याला ८ लाख रुपये दंड आणि ३ महिने सक्षम कारावास, दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त २ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात फिर्यादीकडून अॅड. सचिन सारडा यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. सावन पवार यांनी सहकार्य केले .