आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील 4 हजार एसटी बसेसची चाके रुतली, 3.60 कोटींवर महसूल बुडाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद  - सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन दिले जावे या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी रात्री बाराच्या ठोक्याला एसटी कर्मचारी संघटनांनी संपाचे हत्यार उपसले. या संपामुळे एसटीचा खास ग्राहक असलेल्या लाखो प्रवाशांचे हाल तर झालेच शिवाय मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत साडेतीन हजार बसेसची चाके रुतल्याने एसटी महामंडळाला एकट्या मराठवाड्यात सुमारे  ३ कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
   
एसटी कर्मचाऱ्यांना पदनिहाय वेतनश्रेणी देऊन सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, बेकायदेशीर किंवा अन्यायकारक काढलेली परिपत्रके रद्द करावीत, कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेश आरोग्य सेवा लागू करावी या प्रमुख मागण्यांसह सुमारे  ३०० मागण्यांचा मसुदा कामगारांनी मार्च २०१६ मध्ये महामंडळाकडे सादर केला आहे. त्याचा पाठपुरावा करूनही महामंडळाने मागण्यांचा विचार न केल्यामुळे एसटी कामगारांच्या सर्वच संघटनांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.   प्रवाशांना तसेच दिवाळीनिमित्त गावी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसला.

उस्मानाबाद जिल्ह्यात ६५० बसेसची चाके बंद  
परिवहनमंत्री दिवाकर रावते पालकमंत्री असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ६ आगारातील सुमारे ६५० बसेसची वाहतूक ठप्प झाल्याने महामंडळाचे ८० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. उस्मानाबाद जिल्ह्यात ६ आगार, ८ युनिट आहेत. या सर्व आगारांत ६५० बस असून, २५५० कामगार आहेत.

लातूर जिल्ह्यात एकही बस धावली नाही  
एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे बुधवारी सकाळपासून जिल्ह्यातील रस्त्यांवर एकही बस धावली नाही. शिवाजी चौकातील डेपोमध्ये बसच्या रांगा लागल्या होत्या. तर शहरातील तीन आणि जिल्हाभरातील बसस्थानकांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.  जिल्ह्यात ५२० एसटी बसेस आहेत. लातूर जिल्ह्यातून ४०७ गाड्या दररोज धावतात.   जिल्ह्यातील सुमारे ३ हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे एकही बस धावली नाही. त्यामुळे दररोजचे सरासरी ५० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. रात्री १२ पासूनच कर्मचारी संघटनांनी   बस बाहेर नेणे बंद केले. त्यानंतर आलेली प्रत्येक बस स्थानकात लावण्यात आली.  सर्व बस शिवाजी चौकातील आगारात लावण्यात आल्या.

नांदेड जिल्ह्यातील ५४० बसेस जागेवरच  
संपामुळे नांदेड जिल्ह्यातील  १६  आगारांतील ५४० बसेसपैकी  एकाही डेपोमधून मंगळवारी बस बाहेर पडू शकली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची हक्काची एसटी  उपलब्ध न झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठी गैरसोय झाली. दरम्यान, संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी नांदेड येथे धरणे आंदोलन केले.  या संपात नांदेड डेपोतील ८०० कर्मचाऱ्यांपैकी ५५० कर्मचारी सहभागी झाले. संपात सहभागी सर्व चालक, वाहक व मेकॅनिक आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून डेपोतून एकही बस बाहेर जाऊ शकली नाही.  

औरंगाबादेतून धावल्या केवळ तीन बसेस
औरंगाबाद विभागातील २६०० पैकी १९०० कर्मचारी संपात सहभाग झाले होते. जिल्ह्यातील आठ आगारांमधील ५०० बसेसपैकी पैकी केवळ तीन बस पुणे, बऱ्हाणपूर आणि सोलापूरसाठी रवाना होऊ शकल्या. उर्वरीत ४९७ बस जागेवरच उभ्या होत्या. यामुळे २३ हजारांवर प्रवाशांचे आतोनात हाल झाले.  औरंगाबाद विभागाला  ६० लाखांवर आर्थिक नुकसान झाल्याचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी सांगितले.  

परभणीत केवळ २ फेऱ्यांत २०० किमीचा बस प्रवास
 दररोज १ लाख ४० हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या परभणी विभागातील एसटी बसेसनी मंगळवारी  केवळ २०० किलोमीटरचा प्रवास दोन फेऱ्यांत पूर्ण केला. परिणामी एसटी महामंडळाचे तब्बल ३५ लाख रुपयांचे नुकसान एकाच दिवसात झाले आहे. परभणी विभागातील सुमारे २३३० चालक, वाहक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही संपात सहभाग नोंदवला. रात्री बारापासूनच बसेस आगारात लावण्यात आल्या. मंगळवारी सकाळी परभणी ते सेलू या मार्गावर एक बस धावली.

बीड जिल्ह्यात तीन हजार कर्मचारी संपावर  
 मंगळवारी सकाळी बीड शहरातील बसस्थानकात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.  आगारातील २५० एसटी कर्मचाऱ्यांनी गेटसमोर ठिय्या मांडून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विभाग नियंत्रकांनी स्वत:हून गेट बंद केले.   मंगळवारी जिल्ह्यातील आठ आगारांत ५०० बस जागेवरच उभ्या असल्याने एसटीला दिवसाकाठी  सव्वा लाख प्रवाशांकडून एक हजार  फेऱ्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या ३६ लाख रुपयांच्या उत्पन्नाला फटका बसला आहे.  भरदिवाळीतच एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे जिल्ह्यात पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. खाजगी वाहनचालकांनीही संधीचा लाभ घेतला.

जालन्यात चारशे एसटी बसेसची चाके थांबली
जालना जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर आणि जाफराबाद या चारही आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला. यावेळी रात्री मुक्कामी गाड्या आगारात परत अाल्यानंतर चारही आगारांतून एकही बस धावली नाली. परिणामी संधीचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी भाडे दुप्पट करून प्रवाशांची लूट केली.  जिल्ह्यातील  चार आगारातील तेराशे कर्मचाऱ्यांनी आपले ठाण संबंधित बस स्थानकातच मांडले होते.  दरम्यान जिल्ह्यातील परतूर बसस्थानकात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मुंडण करून आंदोलनात सहभाग नोंदवला. जालना जिल्ह्यात आंदोलनाच्या पहिल्या दिवशी चारशे बसेसची चाके  थांबली होती. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. जिल्ह्यात परिवहन विभागाच्या वतीने खासगी वाहतुकीला परवानगी दिल्याने संधीसाधुपणा करत खासगी टॅक्सी धारकांनी प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारले.  या संपामुळे एसटीचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा... अजिंठा लेणी रस्त्यावर बैलगाडी धावली... 
बातम्या आणखी आहेत...