आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेदरकार काळीपिवळीमुळे लहानग्याचा करुण अंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पैठणकडून शहराकडे भरधाव येणार्‍या काळीपिवळी जीपने अँक्टिव्हाला धडक दिल्याने दुचाकीवरील चारवर्षीय बालकाचा करुण अंत झाला. एमआयटी महाविद्यालयातील प्राध्यापिका जया उमेश सूर्यवंशी पाटील मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना मंगळवारी (26 मार्च) सकाळी 10 वाजता पैठण रोडवरील शांती नर्सिंग होमसमोर हा दुर्दैवी अपघात झाला.

प्रा. जया यांचे घर नक्षत्रवाडी परिसरातील बेंच मार्कसमोर आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा उज्ज्वल हा परिसरातील क्यूट डकलिंग या इंग्रजी शाळेत नर्सरीमध्ये शिकत होता. नेहमीप्रमाणे त्याला सकाळी शाळेत सोडण्यासाठी जात असताना समोरून अचानक भरधाव काळीपिवळी जीप (एमएच 20 बीजे 6173) आली. त्या जीपने प्रा. जया यांच्या अँक्टिव्हाला जोरात धडक दिली. या धडकेत उज्ज्वल रस्त्यावर फेकला गेला. त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर काळीपिवळीचा चालक फरार झाला. जवळपास अर्धातास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तेथे जमलेल्या जमावापैकी काही जणांनी उज्ज्वलला जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला घाटीत हलवण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उज्ज्वलचे वडील उमेश पाटील हे नाशिक येथील एका खासगी कंपनीत इंजिनिअर आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घाटीत धाव घेतली. सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही वाहने जप्त केली आहेत.