आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 40 Thousand Citizen's Water Thurst Solve By Tankar

शहरातील पाण्‍याचे नियोजन न केल्याने 40 हजार नागरिकांची तहान भागतेय टँकरवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महिनाभरापूर्वी (फेब्रुवारी) हसरूल तलाव परिसरातील राधास्वामी कॉलनीतील 40 हजार नागरिकांना बोअरमधून मुबलक पाणी मिळायचे तेव्हा गाड्याघोड्यांपासून सर्वांनाच यथेच्छ अंघोळ घातली जात होती. उरलेले पाणी मातीत मिसळायचे आणि रस्त्यांना नको तेव्हा पूर यायचा. महिनाभरानंतर हे चित्र एकदम पालटले.

जलसुबत्तेची ऐशीतैशी झाली. अंघोळीची गोष्टच सोडा, आता पिण्याच्या पाण्यासाठीही देव आठवू लागले आहेत. ज्यांची ऐपत आहे ते आठ -आठचे गट बनवून टँकर विकत घेत आहेत; पण गरिबांचे काय? एखादी घागर पाणी मिळेल या भाबड्या आशेने त्यांची पायपीट सुरू आहे.

फेब्रुवारीची स्थिती
स्थळ : जटवाडा रस्त्यावरील राधास्वामी कॉलनी.
दुचाकी धुण्यासाठी बोअरचा मोटारपंप तब्बल दहा मिनिटे चालवला जातो. रस्त्यांवर पाणी ओसंडून वाहू लागते. सडा-सारवणाच्या नावाखाली रस्त्यांना अक्षरश: पूर येतो. नळांना पाणी येत नसले तरी घरोघरी बोअरची सुबत्ता! तलाव तुडुंब भरला असल्याने अवघ्या 20 फुटांवर मुबलक पाणी. त्यामुळे स्वच्छंदपणे वापर. उद्याची चिंता नाही. बोअर आटतील ही कल्पनाच कोणी केली नाही.
20 मार्चची स्थिती
स्थळ : तेच अन् तेच नागरिक.
30 हजार लोकवस्तीच्या या वसाहतींमधील सर्व बोअर कोरडे ठाक पडले. मनसोक्त चिंब भिजणारे येथील रहिवासी आज तहानलेले आहेत. परिसरातील भूजल आटल्याने टँकरशिवाय पर्याय नाही. अवघ्या महिनाभरात येथील चित्र एकदम पालटले. स्थिती विदारक बनल्याने आपण पाण्याची नासाडी केल्याची पश्चातबुद्धी त्यांना होत आहे. कोठे पाणी वाहताना दिसले तर संताप येतो; पण आता काहीही करू शकत नाही. दोन लिटर पाण्यात अंघोळ झाली तरी धन्यता मानली जाते. सोन्यापेक्षाही पाणी महत्त्वाचे ही भाषा ऐकायला मिळते. दुष्काळाच्या दाहकतेची ही अनुभूती. ‘अरे, आपण काय करून बसलो!’ असे विचार मनात चमकून जातात.
पुढे काय?
पुढील वर्षी किती पाऊस पडेल हे कोणीही सांगू शकत नसले तरी आपल्या घरासमोरून वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवले तरी आपली गरज भासू शकते, याची जाणीव आता सर्वांना झाली आहे. त्यामुळे येथील अनेकांनी पोटाला चिमटा देऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
का नाही हार्वेस्टिंग?
आपल्याकडील पाणी आटणार नाही, हा खोटा विश्वास. शिवाय फुकट मिळणार्‍या पाण्यासाठी कशाला पैसे खर्च करायचे ही मानसिकता.
कोण आहे जबाबदार?
येथील 40 हजार लोकसंख्येतील प्रत्येकाने पाण्याचा अतिरेकी वापर केला. पण हे जलस्रोत केव्हा तरी आटणार याचा कोणीही विचार केला नाही. तीन फेब्रुवारीला समाजात पत्रकार म्हणून वावरणार्‍या एकाने दुचाकी धुण्यासाठी 10 मिनिटे मोटारपंप सुरू ठेवला. पण, जमिनीत जल पुनर्भरणासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत.
450 फूट खोलीपर्यंत पाण्याचा पत्ता नाही
3 फेब्रुवारीपासून या भागातील पाणी आटण्यास सुरुवात झाली. हर्सूल तलावातील पाणी आटताच 95 टक्के घरांतील बोअर आचके देऊ लागले. तलावात पाणी असताना येथे 20 फुटांपासूनच पाणी लागते. अपवाद वगळता सर्व बोअरची खोली 120 ते 130 फुटांपर्यंत आहे. तलावातील पाणी कमी झाल्यामुळे 2009 मध्ये बोअर 200 फुटांपर्यंत पोहोचू शकले. यंदा बोअर आटल्यानंतर काहींनी 450 फुटांपर्यंत खोदकाम केले. तरीही पाणी लागेना!
अन्य गुंठेवारी भागात का मिळते पाणी?
कैलासनगर, विष्णुनगर, पुंडलिकनगर, त्रिमूर्ती चौकातील न्यू शांतिनिकेतन कॉलनी हा भाग गुंठेवारीत येतो. तरीही या भागाला पाणी देण्यात येते. कारण हा भाग अधिकृत वसाहतीच्या मधोमध आला आहे. त्यामुळे प्रशासनाची इच्छा नसली तरी तेथे जलवाहिन्या टाकण्यात आल्या, नळ जोडण्यात आले. तसे येथे होऊ शकले नाही.
असा आहे परिसर
एकतानगर (चार-पाच गल्ल्यांमध्ये मनपाच्या जलवाहिन्या आहेत.), राधा स्वामी कॉलनी, सारा प्राइड, हर्सूल गावाचा पश्चिमेकडील भाग.
भाडेकरूंसाठी वेगळा बोअर
या भागात महापालिकेचे नळ कनेक्शन आलेले नाहीत. त्यामुळे घरोघरी बोअर आहेत. प्रत्येकाने किमान एक बोअर घेतला आहे. 20 बाय 30 आकाराच्या घरात काहींनी बहुमजली बांधकाम करून खोल्या भाड्याने दिल्या आहेत. त्यांच्यासाठी एक अधिकचा बोअर घेतला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा होतो.
मोठय़ा वसाहतींचा कानाडोळा : याच वसाहतीला लागून सारा प्राइड, सारा वैभव या वसाहती आहेत. येथे अपार्टमेंटबरोबरच रो-हाऊससुद्धा आहेत. दरमहा किमान एक लाख रुपये उत्पन्न असलेल्या दांपत्यांनी येथे काही लाखांच्या मालमत्ता विकत घेतल्या, परंतु भविष्याचा विचार करून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी 5 ते 8 हजार रुपयांचा खर्च करावा, असे त्यांना वाटले नाही.

कधी झाली वसाहत? : 1998 पर्यंत एकतानगरपर्यंतच ही वसाहत विस्तारली होती. त्यानंतर शहराचा विस्तार झाला अन् या भागात लोक राहण्यासाठी आले. ही जमीन हर्सूल येथील शेतकर्‍यांची आहे. त्यांनी त्यांच्या र्मजीप्रमाणे भूखंड पाडत विक्री केली. 2002 नंतर येथे राहण्यासाठी येणार्‍या नागरिकांची संख्या कमालीची वाढत गेली.

का नाही मिळाले पालिकेचे पाणी? : हा परिसर अनधिकृत म्हणजेच गुंठेवारीत आहे. येथील सारा प्राइड, गायकवाड हाउसिंग सोसायटी वगळता कोणाकडेही बांधकाम परवानगी नाही किंवा कर भरला जात नाही. गुंठेवारीत नागरी सुविधा देण्याचा निकष नसल्यामुळे येथे पालिकेकडून पाणीपुरवठा झालेला नाही. एकतानगरला दलित वस्ती दाखवण्यात आल्याने तेथील 30 टक्के घरांना पालिकेकडून पुरवठा होतो. उर्वरित नागरिक खासगी पाइपलाइन टाकून पालिकेचे पाणी घेत आहेत.

रेन वॉटर हार्वेस्टिंग केले असते तर आणखी दोन महिने पाणी मिळाले असते. ही गंभीर चूक आहे. पुढील पावसाळ्यातील पाणी वाहून जाऊ देणार नाही. पाण्याची किंमत कळली. माझ्याबरोबरच इतरांनाही यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करीन. प्रा. कैलास इंगळे


दीडच महिन्यापूर्वी माझ्या पतीने दुचाकी धुण्यासाठी 10 मिनिटे मोटर चालवली. हर्सूल तलाव आटल्यानंतर किमान सहा महिने बोअरच्या पाण्याला अडचण नाही, असा भ्रम होता. पण बोअर आटल्याने टँकरशिवाय पर्याय नाही. मी स्वत: रेन वॉटर हार्वेस्टिंग करून इतरांनाही ते करण्यास भाग पाडेल. शोभा सांगळे, गृहिणी
ही जमीन सुपीकच होती. आतापर्यंत कधी अशी वेळ आली नव्हती. त्यामुळे पाणी संपेल असे कधीच वाटले नाही. आता हर्सूल तलाव आटल्याबरोबर जमिनीतील पाणी संपले. याआधी पाणी पाण्यासारखे वाया घालवले. त्याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे, हे आत्ता कळले. अनसूया चव्हाण, रहिवासी


गुंठेवारी भाग असल्यामुळे येथे नळ कनेक्शन दिले नाहीत. आता मागणी आल्यानंतर टँकर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील नागरिक बोअरचेच पाणी घेतात हे माहिती होते; पण त्यातील एकानेही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही. बेसुमार उपशामुळे जमिनीतील पाणी संपले. हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा सेल