आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथनगरातील 400 घरांतील टीव्ही, वॉशिंग मशीन जळाले, नागरिकांमध्‍ये भितीच वातावरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वीजवाहिन्यांतील उच्च दाबामुळे रोहित्रावरील अॅल्युमिनियमचा प्लग वितळला. परिणामी शुक्रवारी दुपारी नाथनगर (बालाजीनगर) येथील सुमारे ४०० घरात वाढलेला दाब पोहोचून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, सेट टॉप बॉक्स आदी साहित्य जळाले. वीज उपकरणांचा अचानक स्फोट होऊन धूर पसरल्याने लोक घराबाहेर पडून धावत सुटले होते. वीज वितरण कंपनीच्या पथकाने पंचनामे केले. प्राथमिक अंदाजानुसार किमान पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 
 
नाथनगरातील दोनशे केव्हीएची क्षमतेच्या रोहित्रावरून सुमारे ४०० घरांना वीजपुरवठा होतो. त्यातील बहुतांश जणांकडे दोन ते चारपेक्षा अधिक भाडेकरू आहेत. त्यामुळे वीजपुरवठ्यावर कायम ताण असतो. शुक्रवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास नागरिक घरांमध्ये निवांतपणे टीव्ही पाहत, गप्पा मारत बसले असताना अचानक टीव्हीचे पडदे पांढरे झाले. त्यापाठोपाठ त्यात स्फोट झाले. वॉशिंग मशीनमधील भाग जळून धूर निघू लागला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. माजी महापौर त्ऱ्यंबक तुपे यांना या प्रकाराची माहिती मिळताच ते नाथनगरात धावले. त्यांनी तसेच काही नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. 

अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. एम. कुमावत यांच्या नेतृत्वातील पथकाने नुकसानीचा पंचनामा केला. दरम्यान, या प्रकरणात नागरिकांचा कोणताही दोष नसल्याने त्यांना वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तुपे यांनी केली. जिल्हा विद्युत समिती अध्यक्ष खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. 
 
मोठे स्फोट झाले : लक्ष्मीप्रसादखंडेलवाल, कल्पना सुपेकर, मंगला हजारे, कविता रगडे, रमेश नेमाणे, सुनील सिनकर, नितीन चौधरी, योगेश, सरला वाडेकर, संजय ताडे, रामदास गुळवे, नंदा जैस्वाल, सुभाबाई म्हस्के यांनी सांगितले की, टीव्ही, वॉशिंग मशीनमधून मोठे स्फोट झाले. त्यातून धूरही निघू लागल्याने आम्ही सारे घाबरून गेलो होतो. 
 
३००सेट टॉप बॉक्स जळाले : 
उच्चदाबामुळे३०० घरांतील सेटटॉप बॉक्स अॅम्प्लीफायर जळाले. यात ग्राहकांचा, आमचा काहीच दोष नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी हॅथवे एमसीएनच्या कृष्णा गायकवाड यांनी केली आहे. 
 
रोहित्राची कचरा कुंडी : नाथनगरातीलविद्युत वाहिन्या, खांब जीर्ण झाले आहेत. रोहित्राला संरक्षक भिंत नसल्याने तेथे कचराकुंडी तयार झाली आहे. चारही बाजूंनी उघडे असलेल्या या रोहित्रामुळे कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते. खासदार चंद्रकांत खैरे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे यांनी वारंवार सूचना करूनही सुरक्षा भिंत बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे. 
 
पुर्नतपासणीनंतर भरपाईचा निर्णय 
आमच्या पथकाने प्रत्येक घराची तपासणी करून अहवाल तयार केला आहे. तो वरिष्ठांना तो सादर केला जाईल. एक-दोन दिवसांत विद्युत निरीक्षकांचे पथक पुर्नतपासणी करेल. त्यात वीज कंपनीचा दोष असल्याचे निष्पन्न झाले तरच नुकसान भरपाईचा निर्णय होईल. बी.एम. कुमावत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी.  
 
रोहित्रावर काय झाले? 
रोहित्रावरीलविद्युत दाब संतुलित करणारे अॅल्युमिनियमचे प्लग दाब वाढल्याने तसेच हवेतील उष्णतेमुळे वितळले. परिणामी २५० ऐवजी ३५० केव्हीए दाब थेट घरांतील वीज उपकरणांपर्यंत पोहोचला. 
 
आणि घरात काय घडले? 
नाथनगरातील नागरिकांच्या घरात उच्च दाबाला नियंत्रित इलेक्ट्रॉनिक सर्किट ब्रेकर नाहीत. शिवाय वाढीव दाब उपकरणांकडे जाण्यापासून रोखणारे अर्थिंगही नसल्याने उपकरणे जळाली. 
 
..तर उच्च दाबापासून वाचवता येतील टीव्ही, फ्रिजसारख्या वस्तू 
उच्च दाब नियंत्रित करणारी इलेक्ट्रॉनिक सर्किट ब्रेकरसारखी उपकरणे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केल्यास रोहित्रावरून दाब वाढला तरी तो थेट उपकरणापर्यंत पोहोचत नाही. फक्त फ्यूज उडून पुरवठा बंद होतो. त्यामुळे अशी उपकरणे लावावीत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 
बातम्या आणखी आहेत...