आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहमिलन : ४५ डॉक्टर ५० वर्षांनी एकत्र येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केवळ मराठवाडाच नव्हे, तर महाराष्ट्रासह देशाला अनेकोत्तम डॉक्टर देणारे महाविद्यालय म्हणून औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ओळख आहे. या महाविद्यालयात ५० वर्षांपूर्वी रुग्णसेवेचे धडे गिरवणारे ४५ डॉक्टर पुढील आठवड्यात जगाच्या कानाकोपऱ्यातून शहरात एकत्र येत आहेत. या साऱ्यांनी मिळून कोट्यवधी रुग्णांवर उपचार केले.

केवळ डॉक्टरच नव्हे, हजारो विद्यार्थ्यांचे गुरू म्हणूनही त्यांची ओळख आहे. हे सारे दिग्गज एकत्र येऊन घाटी रुग्णालय, महाविद्यालयाला मोलाची मदतही करणार आहेत. शिवाय काही जण ग्रामीण भागात जाऊन ठरावीक कालावधीसाठी रुग्णांची सेवा करणार आहे. तरुणपणीच्या आठवणींमध्ये रमणे प्रत्येकाला हवेहवेसे वाटते. डोळ्यांत हजारो स्वप्ने घेऊन भावनांचा मेळा रंगलेला असतो. सळसळता उत्साह असलेल्या वयात आयुष्याची काही मूल्ये घेऊन चाललेली माणसे पुन्हा एकत्र येतात तो क्षण प्रत्येकाला अविस्मरणीयच असतो. असाच क्षण पुन्हा पुन्हा अनुभवता यावा म्हणून १६ ते १८ जानेवारीदरम्यान औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या १९६५ च्या बॅचचे विद्यार्थी एकत्र येत आहेत. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये कौटुंबिक नाते जपणारी ही डॉक्टर मंडळी आहेत. बॅचचा प्रत्येक जण वैशिष्ट्यपूर्ण आहे. या स्नेहमिलनात ४५ कुटुंबे एकत्र येणार आहेत.

२०० वर विद्यार्थ्यांना पीएचडीचे मार्गदर्शन
मूल्ये जपत वैद्यकीय सेवा देण्यासोबत आमच्यापैकी अनेकांनी ज्ञानदानही केले. माझ्याकडे जवळपास २०० विद्यार्थ्यांचे पीएचडी झाले. आज आम्ही सगळे ७० वर्षांचे आहोत, आमच्यातील १२ मित्र आज नाहीत; पण पुन्हा सर्वांना भेटण्याच्या नुसत्या कल्पनेनेही अंगावर रोमांच उभे राहिले आणि आम्ही नव्याने तरुण झालो, अशा शब्दांत संयोजन समितीचे सदस्य आणि एमजीएमच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. एस. एच. तालिब यांनी भावना व्यक्त केल्या.

लडाखमध्ये सेवा देणाऱ्या अधिकारी
भारतीय सैन्यात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ. फिलोमिना इसाक (वैद्यकीय अधीक्षक, एमजीएम) यादेखील १९६५ च्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात बांगलादेश आणि १९९९ च्या कारगिल युद्धात लेह-लडाख येथे भारतीय सैनिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यांच्यावर उपचारही केले. सैन्यदलातील आरोग्य पथकाच्या देशातील पहिल्या महिला अधिकारी असा बहुमानही त्यांना मिळाला आहे.
संयोजन समितीत पुढील मान्यवर, दिग्गज डॉक्टरांचा समावेश आहे : डॉ. अच्युत ढमढेरे (मूळव्याधी निवारण प्रमुख, बजाज रुग्णालय), डॉ. श्रीगणेश एकबोटे (हृदयरोगतज्ज्ञ, बजाज रू.), डॉ. प्रल्हाद एस. पाटील (बालरोगतज्ज्ञ), डॉ. सुधीरचंद्र कदम (कुलगुरू, एमजीएम विद्यापीठ), डॉ. विनायक माले (कुटुंब कल्याणचे सेवानिवृत्त अतिरिक्त संचालक), डॉ. किशनलाल काबरा, नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधाकर सुभेदार, डॉ. नारायण कामठेकर (सेवानिवृत्त अति.आरोग्य संचालक), डॉ. कुमार कोटेगावकर (इंग्लंडच्या राणीकडून सन्मानित).