आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या 4500 जागा रिक्त राहणार, सीईटीबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीच्या म्हणजेच पीजी प्रथम वर्षाच्या सुमारे साडेचार हजार जागा रिक्त राहणार अाहेत. उस्मानाबाद उपकेंद्र आणि संलग्नित महाविद्यालयांतील पीजी प्रथम वर्षाच्या २२ हजार जागांसाठी १८ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी (१० जुलै) पीजी-सीईटी दिली होती. १६ जुलैला संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला. सीईटी दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पात्र ठरवले तरीही ४,५०० जागा रिक्त राहणार अाहेत. विद्यार्थ्यांनी मागणी केली तरीही सीईटीच्या प्रक्रियेत नसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. 
 
अशी आहे स्थिती 
विद्यापीठाचे ४२, उस्मानाबाद उपकेंद्रातील विभाग आणि १२७ पीजी अभ्यासक्रम चालवणारे संलग्नित महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांचे पहिल्यांदाच फक्त ‘सीईटी’च्या माध्यमातूनच प्रवेश होणार आहेत. या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तरच्या एकूण २१ हजार ९८१ जागा आहेत. विद्यापीठ कॅम्पसमधील ४२ विभाग, उस्मानाबाद कॅम्पसमधील विभागांत प्रथम वर्षासाठी हजार ५३६ जागा आहेत. तर विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद, बीड, जालना उस्मानाबाद जिल्ह्यांतील १२७ पीजी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या १९ हजार ४४५ जागा आहेत. 

यामध्ये राज्य शासनाने विधी, शिक्षणशास्त्र, एमबीए आदी विषयांचाही समावेश अाहे. महाविद्यालयात पदव्युत्तरच्या ७० विषयासाठी ही पीजी-सीईटी’ मार्फतच प्रवेश होतील. ज्यांनी पीजी-सीईटी दिलेली नाही, त्यांना पीजीच्या कुठल्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात अाले अाहे. जर एखाद्या विषयात जागा रिक्त राहणार असेल तरीही त्या जागा रिक्त राहतील, पण कुणालाही कुणाच्याही शिफारशीने प्रवेश देण्यात येणार नसल्याचेही कुलगुरू डाॅ. बी. ए. चोपडे यांनी स्पष्ट केले अाहे. 
 
डाॅ.चोपडे अन् डाॅ. पाटील यांच्यात मतभिन्नता : रिक्तजागांच्या संदर्भात मागील वर्षीप्रमाणे पीजी-सीईटीबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे धोरण अवलंबण्यात येईल का, असा प्रश्न कुलगुरूंना विचारला तर त्यांनी लगेच होकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘जागा रिक्त ठेवता येणार नाहीत, शेवटी विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे निश्चितच प्रवेश देण्याचेच धोरण राहील,’ असे म्हणत असताना प्रभारी अधिकारी डाॅ. सतीश पाटील यांनी कुलगुरूंना मध्येच थांबवले अाणि म्हणाले, ‘अजिबात नाही, ज्यांनी सीईटी दिली नाही त्यांना प्रवेश देताच येणार नाही. भलेही जागा रिक्त राहतील.’ दोघांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे विद्यापीठ प्रशासनाची मतभिन्नता दिसून अाली अाहे. एकंदरीत या प्रकारात पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या ४५०० जागा रिक्त राहणार असून त्यावर काय मार्ग काढला जाणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. 
 
१० अाॅगस्टला होतील स्पाॅट अॅडमिशन 
नोंदणी ऑप्शन फॉर्म भरणे तसेच कागदपत्रांच्या तपासणीसाठी पीजी-सीईटी पात्र विद्यार्थ्यांनी १७ ते २५ जुलैदरम्यान संबंधित विभाग, महाविद्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी २५ जुलैपर्यंत केली जाणार अाहे. ३० जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाईल. 1 अाॅगस्ट रोजी प्रवेशाची पहिली यादी जाहीर होणार असून द्वितीय यादी ऑगस्टला जारी होईल. ज्यांचे दोन्ही यादीमध्ये प्रवेश झाले नाहीत, त्यांना १० ऑगस्ट रोजी स्पाॅट अॅडमिशन दिले जाणार अाहे. त्यानंतर प्रवेश घेतलेल्या ठिकाणी ११ ते १४ अाॅगस्टदरम्यान उपस्थिती नोंदवणे बंधनकारक अाहे. 
बातम्या आणखी आहेत...