आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 उड्डाणपुलांखाली मनपा बांधणार महिलांसाठी शौचालये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपा प्रशासनाने शहरातील उड्डाणपुलांखाली महिलांसाठी शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. काही पूल मनपाच्या, तर काही पूल रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहेत. महामंडळाने जागा वापरण्यास हिरवा कंदील दिल्याने शहरातील सर्व उड्डाणपुलांखाली शौचालये बांधली जाऊ शकतील. स्वच्छ भारत अभियानातील निधी पडून असल्याने यासाठी खर्चाचा प्रश्नच नाही. मनपाच्या या निर्णयामुळे महावीर चौक, क्रांती चौक, सेव्हन हिल्स, सिडको बसस्थानक, टाऊन हॉल अशा पाच ठिकाणी महिलांसाठी शौचालये उभारली जाऊ शकतील.

 

महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेते विकास जैन, माजी महापौर त्र्यंबक तुपे, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. घोडेले यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भविष्यात हे उड्डाणपूल महापालिकेच्याच ताब्यात येणार आहेत. तेव्हा तेथील जागेचा कसा वापर करायचा हे तुम्हीच ठरवा, असे त्यांनी सांगितले. महिलांसाठी शौचालये उभारण्यासाठी जागेची असलेली अडचण यामुळे दूर झाली. शहरातील पाच उड्डाणपुलांखाली शौचालये बांधण्याचे निश्चित करण्यात आले. आता जागा उपलब्ध झाल्याने तातडीने हे काम हाती घेण्यात येणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. शौचालयाला पाणी तसेच वीजही उपलब्ध दिली जाईल. महिलांसाठी शौचालये उभारण्याचे भूमिपूजन होऊन सहा महिन्यांत त्यात काहीही प्रगती झाल्याने माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी संतप्त होऊन थेट मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.

 

‘दिव्य मराठी’चा पुढाकार
शहरातील बाजारपेठ, पर्यटनस्थळे आदी ठिकाणी शौचालये बांधण्याचेही प्रस्तावित आहे. त्याचबरोबर पेट्रोल पंप, हॉटेल्स व्यावसायिकांनी महिलांना शौचालयात प्रवेश द्यावा, असे आवाहन करण्यात आले. यासाठी ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...