आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Watershed Project Sanctioned In Aurangabad District

शाश्वत विकास : "पीपीपी'वर जिल्ह्यात पाच वॉटरशेड प्रकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेती, उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा व वापराचा प्रश्न मार्गी लागण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विकास योजना आणि एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर पाच वॉटरशेड (पाणलोट क्षेत्र) प्रकल्प राबवले जाणार आहेत. तसेच मोसंबी, केशरआंबा, डाळिंब, कापूस आणि मका या फळपिकांचा प्रकल्पही राबवण्यात येणार असल्याची माहिती पणन विभागाचे प्रधान सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी दिली. शुक्रवारी बडे उद्योजक व तज्ज्ञांच्या बैठकीत दिली.

वॉटरशेड आणि फळपिकांच्या प्रकल्पांसाठी काम करू इच्छिणाऱ्या कंपन्यांनी त्वरित प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करून गोयल यांनी या मिशनद्वारे लागवड ते विक्री व्यवस्थापनाचे नियोजन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पाचा सरकार ५० टक्के, कंपनी व शेतकरी ५० टक्के आर्थिक भार उचलणार आहेत. २०३० पर्यंत दूरदृष्टी ठेवून हे प्रकल्प राबवले जातील.

बैठकीला यांची उपस्थिती : बैठकीला विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, विभागीय कृषी सहसंचालक जनार्दन जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, गोदावरी पाटबंधारेचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार, जलतज्ज्ञ विनायक दामले, बी. मोहरमन, पेप्सिको, सबमिलर, युनायटेड ग्रुप, जैन इरिगेशन आदी संस्थांचे अधिकारी व भूगर्भ, जलतज्ज्ञ उपस्थित होते.
एक हजार कोटी खर्चाची तरतूद
या प्रकल्पासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना व एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत १ हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून गावागावांत दुष्काळावर मात करता येईल अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच उपलब्ध पाणी संचयामधून शेतीसाठी ८५ टक्के, पिण्याचे पाणी १५ टक्के आणि उद्योगांसाठी ५ टक्के असे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब ना थेंब जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

शेतीचा विकास
जिल्ह्यात मोसंबी, डाळिंब, केशरआंबा, कापूस आणि मका ही प्रमुख फळपिके घेतली जातात. पण मार्केट, प्रक्रिया उद्योग, ग्रेडिंग, पॅकिंग व्यवस्थापन नसल्याने शेतकरी अधोगतीला चालला आहे. शेतीच्या शाश्वत विकासासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी कंपन्यांनी पंधरा दिवसांत प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना गोयल यांनी केल्या. एका वॉटरशेडसाठी पाच ते दहा हजार हेक्टर क्षेत्र निवडले जाणार. यामुळे जलपुनर्भरण होऊन पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास फायदा होईल. पाच प्रमुख पिकांचे लागवडीपासून ते प्रक्रिया, ग्रेडिंग, पॅकिंग व विक्री व्यवस्थापन केले जाणार असल्याने शेती, शेतकरी, गावकरी यांचा शाश्वत विकास होणार असल्याचे कृषी सहसंचालक जनार्दन जाधव यांनी सांगितले.