आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 50 Crores Litter Petrol Diseal Depot Builds In Aurangabad

वेध भविष्‍याचा: औरंगाबादेत होणार 50 कोटी लिटरचा पेट्रोल-डिझेल डेपो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विकासाची कास धरीत वेगाने वाटचाल करणा-या औरंगाबाद शहराच्या इंधनाची भूक भागवण्यासाठी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात इंधनाचा (पेट्रोलियम) साठा उपलब्ध व्हावा यासाठी औरंगाबादेत 50 कोटी लिटर क्षमतेचा भव्य इंधन डेपो उभारला जाणार आहे. पुढील दोन वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 100 एकर जागेच्या मागणीचे पत्र दोन पेट्रोलियम कंपन्यांनी एमआयडीसीला दिले आहे.


दिल्ली-मुंबई कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्पासाठी इंधन (पेट्रोल-डिझेल) डेपो अत्यावश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शनिवारी (1 जून) सुभेदारी विश्रामगृहात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी शहर आणि जिल्ह्यातील दिग्गजांची या विषयावर विस्तृत चर्चा झाली. बैठकीत हिंदुस्थान पेट्रोलियमचे प्रादेशिकअधिकारी राजेश तुपकर, व्यवस्थापक प्रशांत परमार, इंडियन ऑइलच्या औरंगाबाद विभागाचे व्यवस्थापक विजय गवारे, पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास, सदस्य अशोक चुन्नीलाल, जे.आर राणा, कैलास सोनवणे, संदीप घंटे यांची उपस्थिती होती. या डेपोसाठी शेकटा परिसरातील जमिनीची उर्वरित. पान 12

पुरवठा सुरळीत होणे आवश्यक
वाढणा-या इंधनाच्या मागणीमुळे पाणेवाडी येथील डेपोवर भार वाढतो आहे. या डेपोला पर्याय असणे आवश्यक आहे. औरंगबादला पर्यायी डेपो झाल्यास पुरवठा करणे सुरळीत होईल. ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
विजय गवारे, व्यवस्थापक, इंडियन ऑईल

औरंगाबादचे कल्याण होईल
औरंगाबादला डेपो झाल्यास बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड या सह जळगाव, धुळ्याचा फायदा होईल. औरंगाबादचे तर कल्याण होईल. प्रगतीचा वेग वाढेल आणि इंधनाच्या त्रासातून कायमची सुटका होईल.
अखिल अब्बास, सचिव , पेट्रोल डिलर्स असोसिएशन औरंगाबाद


डेपोसाठी होणार 200 कोटींवर खर्च
औरंगाबादेत डेपो उभारण्यासाठी सुमारे 100 एकर जागेची आवश्यकता आहे. मनमाडहून इंधन रेल्वेद्वारे आणले जाते. त्यामुळे ही जागा शेंद्रा परिसरातील शेकटा (चिकलठाण्यालगत) रेल्वे लाइनजवळ असावी असा आग्रह आहे. एमआयडीसीने ही जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांनी एमआयडीसीला निवेदने दिली आहेत. यात एचपीसीएल आघाडीवर आहे. जागा मिळताच सुमारे दोन वर्षात हा डेपो उभा राहण्याची शक्यता आहे. यासाठी सुमारे 200 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार असल्याचे दोन्ही कंपन्यांच्या अधिका-यांनी सांगितले. खासदार चंद्रकांत खैरे हे केंद्रपातळीवर असलेल्या पेट्रोलियम सल्लागार मंडळावर महाराष्टÑाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे मराठवाड्यासाठी स्वतंत्र डेपो मिळणे शक्य आहे.


10 टँकची क्षमता 50 कोटी लिटर
औरंगाबादेत होणारा डेपो हा 50 कोटी लिटर इंधन क्षमतेचा असेल. 50 हजार केएल (किलोलिटर) म्हणजेच 5 कोटी लिटरचा साठा असलेल्या 5 पेट्रोल आणि 5 डिझेलच्या टँक या ठिकाणी उभारल्या जातील. या टाक्यांमध्ये पाइपलाइन अथवा रेल्वेगाडीच्या साह्याने इंधनाचा पुरवठा केला जाईल.


50 कोटी लिटरचे गणित असे...
1 केएल (किलोलिटर ) = 1 हजार लिटर
एका टँकची क्षमता 50 हजार केएल
50,000 केएल म्हणजे 5 कोटी लिटर
पेट्रोलच्या 5 टाक्यांची क्षमता 25 कोटी लिटर
डिझेलच्या 5 टाक्यांची क्षमता 25 कोटी लिटर
एकूण क्षमता - 50 कोटी लिटर


इंधनचोरीची समस्या सुटणार
पानेवाडीचा डेपो भारत पेट्रोलियमचा असून तेथून हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल यांना पुरवठा केला जातो. मुंबईतील मुख्य डेपोतून पानेवाडीला पाइपलाइनद्वारे पुरवठा होतो. औरंगाबाद शहराला दररोज सुमारे 3 लाख लिटर पेट्रोलची गरज भासते. जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत. याशिवाय मोठे उद्योजक पानेवाडीच्या डेपोतून इंधन घेतात. औरंगाबादेत इंधनाचे टँकर येईपर्यंत माफिया आणि चोरांनी त्यातील बरेच इंधन चोरलेले असते. ही समस्या सुटू शकते.


1500 पंपांना होईल पुरवठा
दहा वर्षापूर्वी रेल्वे आणि इंडियन ऑइलच्या जमिनीच्या वादामुळे औरंगाबादहून पानेवाडीला हलवलेला डेपो 110 किमीवर आहे. तेथून मराठवाडा, खान्देशातील 1500 पंपांना पुरवठा केला जातो. तो आता औरंगाबादहून होईल.


वेळ, खर्चही वाचेल
दिल्ली -मुंबई कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर इंधनाची आवश्यकता आहे. वाहनांची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. औरंगाबाद येथे डेपो झाल्यास शहरातील पंपमालकांचा वाहतुकीचा खर्च आणि वेळ वाचेल. शिवाय पुरवठ्यात सातत्य राहील. येथील वाहनचालकांना होणारा त्रास टळेल.


मंगळवारी होणार मसुरीत बैठक
4 जूनला या संदर्भात मसुरीत बैठक होत आहे. त्यात पेट्रोलियम कंपन्यांचे चेअरमन, केंद्रीय पेट्रोलियममंत्री उपस्थित असतील. पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. चंद्रकांत खैरे, खासदार


डेपोसाठी 100 एकर जागा मागितली
या डेपोसाठी आम्ही एमआयडीसीकडे 80 ते 100 एकर जागेची मागणी केली आहे. जागा मिळाल्यानंतर दोन वर्षात आम्ही डेपो उभारण्याचे काम पूर्ण करू शकतो. - राजेश तुपकर, प्रादेशिक अधिकारी, हिंदुस्थान पेट्रोलियम