आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडे तोडली, पक्षी 50 टक्क्यांनी घटले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - झाड हे पक्ष्यांचे आश्रयस्थान. झाडावरील घरट्यात पक्षी जन्मतात, वाढतात, त्यांचा वंश वाढतो. परिसंस्थेचे (इको सिस्टिम) जतन करण्याची जबाबदारी पक्षी शतकानुशतके पार पाडत आहेत. मात्र, गेल्या 10 वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांचे 50 टक्के प्रमाण घटले आहे, पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक यांचा हा निष्कर्ष.

पुण्याच्या इला फाउंडेशनच्या सर्वेक्षणाचा हवाला देत डॉ. पाठक यांनी पक्ष्यांच्या घटत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, घरातील आरशाच्या मागे, ट्यूबलाइटवर किंवा फोटोच्या मागे असणारी घरटी काळाच्या ओघात नष्ट झाली. त्याचबरोबर अंगणात किलबिल करणारे पक्षीही दिसेनासे झाले आहेत. शहरामध्ये सिमेंटची जंगले उभी राहिली आणि या पक्ष्यांची हक्काची घरटी हिरावली गेली.

पर्यावरणाकडे मानवाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. अन्नसाखळीवरही त्याचा परिणाम झाला आहे. या परिणामामुळे पर्यावरणाचा अविभाज्य घटक असलेले पक्षी दिवसेंदिवस नष्ट होत असल्याचे दिसत आहे. सामाजिक पर्यावरणही धोक्यात आले आहे. कावळे, चिमणी, बुलबुल, साळुंकी, सातभाई, दयाळ हे सामाजिक पक्षी कमी झाले आहेत, असे डॉ. पाठक यांनी सांगितले.

झाडे कमी झाल्याचा परिणाम : वड, पिंपळ, बाभूळ, लिंब हे मोठे वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मदत करतात. या वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे पक्ष्यांच्या निवासात मोठय़ा प्रमाणावर अडथळा आला आहे. शिवाय घरासमोर असणारी झाडे नष्ट झाल्यामुळेही वस्त्यांजवळचे पक्षी कमी झालेले दिसतात. झाडे असलेल्या वस्त्यांमध्ये अजूनही पक्षी पाहायला मिळतात. एक मोठे झाड हे 75 जिवांचे आर्शयस्थान असते. माणसाबरोबरच कीटक, अळ्या, प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, जीवजंतू झाडावर अवलंबून असतात. त्यासाठी झाड किमान 20 वर्षांचे व्हावे लागते. परंतु हे वृक्ष काही क्षणात तोडले जातात.


दोन झाडे देतील आधार
घरासमोर दोन फळ- फुलांची झाडे लावल्यास पक्ष्यांना आधार मिळेल.चाफा, जास्वंद, पारिजात, सिंगापूर चेरी, बदाम ही झाडे पक्ष्यांना आकर्षित करतात. व्हरंडा, खिडकीवर पक्षी घरटी तयार करतील. - डॉ. किशोर पाठक, पक्षीमित्र


झाडे लावा, पक्षी वाचवा
बाग-बगिचे, प्रार्थना स्थळाजवळील मोकळ्या जागेवर वड, पिंपळ, उंबर, बदाम यांसारखी झाडे लावावीत. त्यामुळे विविध पक्षी, कीटकांची संख्या वाढेल.
प्रत्येकाने घरासमोर कमीत कमी दोन फळझाडे व दोन फुलझाडे लावावीत. उदा. जास्वंद, बिट्टी, पारिजातक आणि सिंगापूर चेरी, बदाम.