आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 50 Thousand Work Fund Access In Municipal Commissioner Hand Aurangabad

50 हजारांची कामे आयुक्तांच्या हाती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नगरसेवक आणि त्यांच्याच कंत्राटदारांच्या रिंगमुळे किरकोळ कामांत मनपाचा पैसा पाण्यासारखा खर्च होत असल्याने त्याला चाप लावण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी 50 हजार रुपयांखालील कामे आपल्या अखत्यारीत घेतली आहेत. त्यामुळे यापुढे अशा कामांना आयुक्तांची मंजुरी लागणार आहे.

भिंती बांधणे, दुरुस्ती, देखभाल, पाण्याच्या लाइनची दुरुस्ती, ड्रेनेज चोकअपपासून अनेक छोटी कामे 50 हजारांच्या आत होतात. 25 हजारांपर्यंतची ए 1 ची कामे आणि 3 हजारांपर्यंतची रेट लिस्टची कामे ही नगरसेवक आणि त्यांच्या जवळच्या मंडळींचे हक्काचे कुरण बनले आहे. दरमहा ए 1 ची किमान 150 कामे, तर रेट लिस्टची 800 कामे केली जातात. ही कामे एकतर नगरसेवकच करतात किंवा नगरसेवकांचे नातेवाईक, कार्यकर्ते करतात. यावर कुणाचा धरबंद नसल्याने व ही कामे तातडीने करावयाची लहानसहान कामे असल्याने त्यांची संख्या वाढत गेली व मनपाच्या तिजोरीतून दरमहा लाखो रुपये त्यात जात आहेत. एकीकडे मनपाच्या तिजोरीत पैसे नसल्याने विकासकामे करणे अवघड झाले असताना ही भगदाडे बुजवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

नगरसेवक व कंत्राटदारांची ही रिंग मनपालाच अडचणीत आणत असल्याने आता आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी या कामांना चाप लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 50 हजार रुपयांपर्यंत खर्चाची कामेही आपल्या अखत्यारीत घेतल्याने या नगरसेवकांचे व त्यांच्या जवळच्यांचे दरमहाचे उत्पन्न थांबणार आहे. आयुक्तांनी तशा संदर्भातील सूचना लेखा विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे आयुक्तांच्या मंजुरीशिवाय या कामांना आता मंजुरी मिळणार नसून काम अत्यावश्यक असेल तरच मंजूर होणार असल्याने मनपाचा वारेमाप उधळला जाणारा पैसा वाचणार आहे.