आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणच्या जलशुद्धीकरण टाकीत साचला तब्बल 50 ट्रॅक्टर गाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- मागील सात वर्षांपासून पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील टाकीची स्वच्छता केली नसल्याने आतापर्यंत चार फुटांपर्यंत गाळ या टाकीत साचला आहे. चार दिवसांपासून साचलेला गाळ काढण्याचे काम नगर परिषदेने हाती घेतले असून आतापर्यंत ५० ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला आहे.  आणखी दहा ते पंधरा ट्रॅक्टर गाळ या टाकीतून निघणार असल्याचे नगराध्यक्ष सूरज लोळगे,भाजपचे गट नेते आबा बरकसे यांनी सांगितले.

मागील चार-पाच महिन्यांपासून शहरात दूषित पाणीपुरवठा होत अाहे. त्यामुळे ओरड होऊ लागल्याने नगराध्यक्ष लोळगे यांनी जायकवाडी येथील जलशुद्धी केंद्राची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे निदर्शनास आले होते.  त्यानंतर शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनीदेखील शिवसेनेच्या नगरसेवकांना बरोबर घेऊन दूषित पाणी प्रश्नाबाबत नगर परिषदेचे वाभाडे काढल्याने शिवसेना-भाजपचे राजकारणही रंगले.  

धरणातील अशुद्ध पाणी प्यावे लागणार
मागील चार दिवसांत या जलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीतून चाळीसहून अधिक ट्रॅक्टर गाळ निघाल्याची बाब समोर आली असून आणखी दहा ते पंधरा ट्रॅक्टर गाळ टाकीतून निघणार असल्याचे नगराध्यक्ष लोळगे म्हणाले. मात्र, हा पूर्ण गाळ निघेपर्यंत तरी शहरवासीयांना धरणातील अशुद्ध पाण्यावर आपली तहान भागवावी लागणार आहे. या जलशुद्धीकरण केंद्रातील टाकीतून दरवर्षी गाळ काढला जातो. पाण्याचा पुरवठा लक्षात घेता गाळाचे प्रमाण यावर्षी वाढले असल्याचे  कर्मचारी भगवान कुलकर्णी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...