आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत पावसाने ओलांडला 500 मिमीचा टप्पा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सोमवारी रात्री साडेदहा वाजता जोरदार कोसळणारा पाऊस मंगळवारी दिवसभरही विसावा घेत पडत होता. दुपारी अडीच वाजेपर्यंत 47.4 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. या पावसाने खरिपातील पिकांना तारले असून रब्बीच्या पिकांसाठी आशा पल्लवित झाल्या आहेत.

2011 मध्ये 667 मि.मी. पाऊस झाला होता. यंदा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच 507 मि.मी पाऊस झाल्याने 2011 चा आकडा ओलांडण्याच्या दिशेने पावसाची वाटचाल सुरू आहे. यंदा मान्सूनच्या चार नक्षत्रांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने पाणी वाहून न जाता जमिनीत जिरत आहे; परंतु ऐन पीक भरणीच्या वेळेला आश्लेषा आणि मघा नक्षत्रात पावसाने दांडी मारली. या नक्षत्रांमध्ये 48.8 मि.मी. खंडित पाऊस झाला. त्यात पारा 33 अंशांवर पोहोचला होता. त्यामुळे ज्वारी, बाजरी, मक्याच्या कणीस भरणीला फटका बसत होता; पण पूर्वा नक्षत्रात सोमवारी 26.4, मंगळवारी दिवसभरात 21 मिमी पाऊस झाल्याने दिलासा मिळाला.

मुसळधार कोसळणार
येत्या चोवीस तासांत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.